इंदापूर(प्रतिनिधी अशोक घोडके): मी हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन वर्गात गुणवत्तेबरोबर क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविले असल्याचे मनोगत सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने यांनी व्यक्त केले.
गोतंडी येथे गौतमेश्वर माध्यमिक विद्यालयात 73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर श्री.माने बोलत होते. यावेळी गौतमेश्वर माध्यमिक विद्यालय संस्थेचे अध्यक्ष दिनकर नलवडे, गोतंडी विका सोसायटीचे चेअरमन अंकुश माने इ. उपस्थित होते.

पुढे सोनाई समुहाची वाटचालीबाबत बोलताना माने म्हणाले की, शेतकरी कुटुंबियात माझा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण मंदिर रूईकर म्हणजे याचठिकाणी झाले. कष्टकरी वडिलांच्या कामामुळे शेटफळ, डोर्लेवाडी, रेडणी व इंदापूर अशा अनेक ठिकाणी हालाकीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. इंदापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच देश सेवा करण्याचा मनोदय केला आणि देशाच्या पायदलात भरती झालो. मनापासून उत्कृष्ठ अशी देशसेवा केली. सुट्टीला गावाकडे आल्यानंतर व्यवसायामध्ये लक्ष दिले. प्रथम किराणा दुकानापासुन व्यवसायाची सुरूवात केली नंतर आडत दुकान सुरू करून व्यावसायातील एक पक्के स्थान केले. व्यवसायात निर्माण झालेल्या आवडीमुळे त्याचे रूपांतर उद्योग क्षेत्रामध्ये झाले आणि सोनाई दूध संघाची स्थापना केली. यामाध्यमातून विविध सोनाईचे विभाग सुरू केले यामध्ये कॅटल फिल्ड, पेट्रोल पंप, दुचाकी बजाज कंपनीचे शोरूम, सोनाई खाद्य तेल व दुधापासून बनविणारे विविध पदार्थाचे उत्पादन करून उद्योग क्षेत्रात भरारी घेतली. यामधून अनेक कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला. कामाच्या ठिकाणी महिला व पुरूषांना कामावर येण्यास गैरसोय होऊ नये म्हणून बससेवा सुरू केली.
दशरथ माने यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून एक यशस्वी उद्योजक कसा निर्माण झाला याबाबतचे धडे शाळेतील मुलांना मिळाले यामुळे उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या सरूवातीस प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आला. स्वागतगीत व लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी इंदापूर तालुका विज्ञान प्रदर्शनात प्रथम आलेला यश राहुल देवकर तसेच वक्तृत्व, निबंध स्पर्धा आणि शासकीय चित्रकला स्पर्धेत प्राविण्य मिळविणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
शेवटी आभार मुख्याध्यापक श्री.जाधव यांनी मानले.