बारामती(वार्ताहर): महिलेला प्रसुतीगृहात घेऊन डॉ.तुषार गदादे व्याख्यानाला जात असतील व बाळाचा मृत्यू होत असेल तर विकसीत बारामतीत व अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
या गंभीर प्रकरणाबाबत गोपाळ तुकाराम गायकवाड (रा.प्रतिभानगर, बारामती) यांनी उपविभागीय पोलीस अधिकार्यांसह शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा व कामात निष्काळजीपणा केल्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक वर्षापुर्वी तुकाराम गायकवाड हे अकलुज याठिकाणी वास्तव्यास होते. पत्नीस दिवस गेल्याची गोड बातमी कळाल्याने अकलूज येथील ज्ञानराज हॉस्पीटल डॉ.चव्हाण यांचेकडे 8 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपचार घेतले. त्यानंतर पुढील खात्रीशिर, योग्य उपचार व प्रसुती चांगली व्हावी म्हणून विश्र्वासाने बारामती येथील नामांकित शिवनंदन हॉस्पीटल, डॉ.तुषार गदादे, हरिकृपानगर, बारामती याठिकाणी घेऊन आले. गायकवाड कुटुंब प्रतिभानगर याठिकाणी वास्तव्यास होते.
दि.22 डिसेंबर रोजी अचानक पत्नीच्या पोटात दुखू लागले म्हणून फिर्यादीचा भाऊ विशाल गायकवाड, बहीण ज्योती बल्लाळ यांनी पत्नीस शिवनंदन हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन गेले. याबाबतची माहिती फिर्यादी व फिर्यादीचे मेव्हुणे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांना दिली. सदर प्रसंगी फिर्यादीसह नवनाथ बल्लाळ, निलेश मोरे उपस्थित होते. डॉ.गदादे यांनी तपासणी करून रात्रौ 10.30 च्या आसपास प्रसुती करावी लागेल असे सांगून रात्रौ 8 च्या दरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल केले. फिर्यादीने विनंती केली प्रसुती नैसर्गिकरीत्या झाली तर बरं होईल. पावणेनऊच्या दरम्यान प्रसुती सिझरने करावी लागेल असे सांगितले त्यासही फिर्यादी व उपस्थितांनी मान्यता दिली. दरम्यान डॉ.गदादे हॉस्पीटलमधून निघून गेले याबाबत हॉस्पीटलच्या चौकशी केंद्रात चौकशी केली असता ताबेनगर येथे डॉ.हिम्मतराव बावस्कर यांच्या व्याख्यानाला गेले असल्याचे व लगेच येणार असलेही सांगण्यात आले.
डॉ.गदादे आलेच नाही महिलेची प्रकृती बिघडली. हे पाहुन नर्स वैभवी सणस व इतर कर्मचार्यांनी डॉ.गदादे यांना कल्पना दिली. तरीही डॉक्टर आले नाही. फिर्यादीचे मेव्हुणे नवनाथ बल्लाळ यांनी डॉक्टरांना मेसेज व फोन केला तरीही परिस्थितीबाबत निष्काळजीपणा दाखविला व वेळेत उपचार केले नाही. प्रसुतीच्या वेदना महिलांनीच जाणाव्या म्हणतात त्याप्रमाणे रात्री 10.30 च्या दरम्यान बाळाचे पाय बाहेर आले. यावेळी सुद्धा डॉ.गदादे हजर नव्हते. रात्री 11.15 वा. स्वत:च्या आय टेव्हन्टी कार मधून हॉस्पीटलमध्ये दाखल झाले. काही क्षणात फिर्यादीचे मेव्हुणे यांना बोलावून प्रसुतीला उशीर झाला प्रसुती साडेनऊच्या दरम्यान करणे गरजेचे होते. बाळाचे हृदय बंद पडले असून पुढील उपचारासाठी डॉ.वरद देवकाते यांच्याकडे पाठवावे लागेल असे सांगून त्यांनी स्वत:च तातडीने रूग्णवाहिकेतून डॉ.देवकाते यांचेकडे पाठविले. डॉ.देवकाते यांनी सकाळी 7 वा. बाळाचा मृत्यू झाल्याचे सिद्ध केले.
डॉ.गदादे यांच्या हलगर्जी व निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे कळताच बाळास सिल्व्हर ज्युबिली शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.