सर्वसामान्यांनी कोणतीही वाईट कृती केली तर त्यास कृतीच्या तिपटीने शिक्षा केली जाते कित्येक वेळा समाजातून त्या व्यक्तीस दुर्लक्षित केले जाते. राजकीय मंडळींनी काही केले तरी त्यांना सहजपणे सोडले जाते त्यामुळे लोकशाही आहे की, हुकूमशाही हा खरा प्रश्र्न पडलेला आहे.
आपण शाळेत शिकलो आहे. वर्गात जर सतत बडबड करणारा विद्यार्थी असेल तर त्यास मास्तर म्हणत असे..बरं झाले तुला खपराचे तोंड दिले नाही ते कधीच फुटले असते. पण आज महापुरूषांबाबत मंत्र्यांची जीभ घसरत असेल तर याबाबत तेव्हाचे मास्तर काय म्हणाले असते.
आज या मंत्र्याने लावली जीभ टाळ्याला याप्रमाणे वाचाळ वक्तव्य केले. त्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला. समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने तर या मंत्र्याच्या अंगावर शाई फेकली. या शाईफेकीबाबत सत्ताधारी कितीही काही केले तरी आमचा माणुस असे म्हणतील. मात्र, विरोधात बसलेल्यांनी शाईफेकीबाबत लोकशाही व संस्कृतीच्या विरोधातील घटना असे म्हणून त्यांचे म्हणणे कितपत योग्य ठरते. सोम्याला गोम्याची साथ म्हटलं तर वावगे ठरू नये.
तो मंत्री, राज्यपाल बोलले काय याचे तरी भान या विरोधात बसणार्या मंत्र्यांना असले पाहिजे. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारत देशातील राजकारणातील जात,धर्म, वंश भेद जर काढला तर आपण काही काळातच महासत्ता झालेलो दिसेल. राजकीय पक्षाचा आत्मा कार्यकर्ता नव्हे तर जात, धर्म, वंश हा खरा आत्मा आहे. याशिवाय राजकारण होणारच नाही हे अशा घटनांवरून दिसते. ज्याप्रमाणे एखाद्याने अनुसूचित जाती जमातील लोकांचा अपमान केला, द्वेष व्यक्त केला तर करणार्यावर ऍट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला जातो. भारत देशाच्या राजकारणात बदल करून जो महापुरूष, देव, देवतांची नावे घेतील त्यावर राजकारण करतील त्यांच्यावर ऍट्रॉसिटी ऍक्टपेक्षा कडक कायदा, कलम करावा म्हणजे सत्तेच्या मस्तीत असणारे असे वाचाळ वक्तव्य करणार नाही व संबंधित विविध जाती धर्माचा अपमान, अवमान होणार नाही. पण,मांजराच्या गळ्यात घंटी बांधावी कोणी असा प्रश्र्न आहे.
आज मंत्र्याने महापुरूषाचा अपमान, अवमान होईल असे गैरकृत्य केल्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. शाई फेकीनंतर या मंत्र्याचा रूबाब काय होता आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटल्यानंतर काय अवस्था झाली. तुम्ही मंत्री झाला म्हणून काहीही करायचे, काहीही बोलायचे का? संविधानाने सर्वांना समान हक्क दिलेला आहे याचा विसर या लोकांना पडलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे आमदार, खासदार आहेत ते सर्व एका माळेचे मणी आहेत. सोम्याला गोम्याची साथ याप्रमाणे शाईफेकीबाबत वक्तव्य जर करीत असतील तर येणार्या दिवसात आमचा सुद्धा नंबर येईल असे वाटणार्यांनी एकमेकांना साथ देण्याचे काम केले आहे. हे मंत्री एकमेकांना कशी साथ देतात हे भारत देशातील व महाराष्ट्रातील तमाम जनतेने उघड्या डोळ्याने पाहिले आहे.