शासकीय व राजकीय मंडळींनी लावली शेतकरी उपोषणकर्त्यांची थट्टा : बाह्यवळण (रिआलाईनमेंट) रद्द करण्याचे राहिले बाजुला ढुंकूनही कोणी बघेना….

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): गेली कित्येक वर्ष याच राजकीय मंडळींच्या पाठीमागे शेतकरी उपोषणकर्ते ठाम राहिले मात्र, बाह्यवळण (रिआलाईनमेंट) रद्द करण्याचे राहिले बाजुला साधं सामाजिक भान जपत कोणी ढुंकूनही पाहत नसेल तर या शासकीय व राजकीय मंडळींनी अक्षरश: शेतकरी उपोषणकर्त्यांची थट्टा लावली असल्याचे बोलले जावू लागले आहे.

आज शुक्रवार.(दि.11) उपोषणाच्या पाचव्या दिवशीही उपोषणकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषणकर्त्याची प्रकृती खलावत चाललेली असल्याने त्यांना जागेवरच उपचार देण्यात येत आहेत.

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील होणारे बाह्यवळणाच्या (रिआलाईनमेंट) मोजणीसाठी पोलीस संरक्षणात आलेल्या भूमी अभिलेखच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना मोजणी न करताच रिकाम्या हाती परतावे लागले.

या उपोषणाला बसलेल्या शेतकर्‍यांच्या मागण्या सोडवण्यासाठी आजपर्यंत कुठलाही कार्यक्षम अधिकारी किंवा बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार तसेच इंदापूर तालुक्याचे आमदार देखील आले नसून त्यांना शेतकर्‍यांबद्दल किती कळवळा आहे हे दिसून येत आहे.

यावेळी उपोषण करते सर्जेराव जाधव म्हणाले की, शासन आमच्या मागणीचा कसलाही विचार करत नाही. उलट दडपशाही करत आहे. शेतकरी प्राणांतिक उपोषणाला बसलेले असताना देखील बाह्यवळण (रिआलाईनमेंट) मोजणीसाठी पोलीस बंदोबस्तात येऊन शेतकर्‍यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज येथील बाह्यवळणाची मोजणी करण्याकरीता चौथ्यांदा अधिकारी आले होते. मात्र शेतकर्‍यांचा विरोध लक्षात घेता ते मोजणी न करताच परत गेले. स्थानिक अधिकार्‍यांनी आमचा प्रश्न वरिष्ठ पातळीवरती मांडवा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोणी खात्रीपूर्वक सांगायला येत असेल की, आम्ही तुमचा प्रश्न मार्गी लावू त्याक्षणी आम्ही उपोषण सोडू.

यावेळी भारतीय जनता पार्टी इंदापूर तालुका यांच्या वतीने उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. येणार्‍या दोन दिवसांमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी बैठक लावून देण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.

यावेळी ऍड.कृष्णाजी यादव, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लाला पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, विलास वाघमोडे, दिनकर नलवडे, अशोक कदम इ.सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!