अशोक घोडके यांजकडून..
इंदापूर(प्रतिनिधी): आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून धनगर समाज विविध पक्षाच्या विळख्यात सापडलेला आहे त्यामुळे सर्वच पक्षांच्या चिन्हांना साखळ दंडाने बांधून आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आले आहे.
डॉ.शशिकांत तरंगे यांनी शाहू-फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवन, इंदापूर याठिकाणी धनगर समाज आरक्षणाबाबत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी समाजातील महेंद्र रेडके, आप्पा माने, नानासाो खरात, कुंडलिक कचरे, विशाल मारकड, सिताराम जानकर, संजय रुपनवर, तुकाराम करे, तेजस देवकाते, सतीश तरंगे, तानाजी शिंगाडे, मोरेश्वर कोकरे, यशवंत कचरे, तानाजी मारकड, सौरभ अर्जुन, भैय्या बिबे,दिलीप मारकड, आबा मारकड, अमोल करे इ.मान्यवरांसह बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.

येळकोट येळकोट जय मल्हार…पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा…विजय असो, आरक्षण आमचे हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे….कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, धनगर ऐक्य परिषदेचा विजय असो अशा जयघोषामध्ये सर्वच पक्षांच्या चिन्हांना साखळ दंडाने बांधून घोषणा देण्यात आल्या.
गेली 70 वर्षापासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेल्या सर्वच पक्ष आणि पार्टीचे जोडे बाजूला ठेवून समाजाने आरक्षणाच्या मुद्यावर एकत्र आले पाहिजे असेही आवाहन यावेळी करण्यात आले. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्व पक्षांच्या चिन्हांना साखळदंडात बांधून ठेवणार आहे, कोणालाही सोडणार नसल्याचे अशी ठाम भूमिका धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
कोणत्या पक्षाने 22 योजना लागू केल्या 1 हजार कोटींची तरतूद केली तर काही पक्षांनी सत्तेत बसल्यानंतर योजना बंद केल्या. कोण म्हणतं धनगर समाजाला न्याय देऊ तर कोण म्हणते आम्ही खरे धनगर समाजाचे कैवारी आहोत. यासर्व आश्र्वासनामुळे धनगर समाज 70 वर्ष वाट पाहत आलेला आहे. जो सत्तेत बसतो तो ढोल वाजवीत म्हणतो, आरक्षणासाठी प्रयत्न करणार ते आमचे सरकार देणार असे म्हणत मागच्या सरकारचे वाभाडे बाहेर काढतात. तोंड वर करून म्हणायचे मागील सरकारने समाजाची थट्टा करून राजकीय शैक्षणिक व आर्थिक आश्वासने दिली असे म्हणून समाजाला खेळवत ठेवायचे आणि पुन्हा पाढे तेच हे कित्येक वर्ष चालणार हा खरा समाजातील युवकांना पडलेला ग्रह ग्रहण प्रश्न आहे.
आजपर्यंत रेटून खोटे बोलणार्यांनी आश्र्वासना धर्म पाळला पाहिजे होता. देशातील चुकीच्या व्यवस्थेमुळे समाजावर ही अवस्था आली आहे. समाजातील कार्यकर्ता जास्तीचे बोलायला लागला की, त्यास स्वतःकडे आकर्षित करून त्याच्या गळ्यात पक्षाचा पट्टा बांधतात मग तो त्याच पक्षाचे ध्येय धोरण व सांगेल तेच करीत असतो. मग तो कोणता समाज, मिळेल की आरक्षण, हे काय देवाचे खोबरे आहे का फोडलं की लगेच मिळेल असे रेटून सांगून आरक्षणाचा पेटता दिवा विझवण्याचे काम अशी मंडळी करीत आलेली आहेत.
राजकीय मंडळींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा विसर पडला आहे. 70 वर्ष आज आरक्षणासाठी राज्यकर्ते समाजाला खेळवत ठेवीत असतील तर आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी असत्या तर या राज्यकर्त्यांची कान उघडणे करून त्यांना त्यांची जागा दाखवली असती. राजकीय मंडळी समाजाच्या मतावर डोळा ठेवायचा नंतर वापरा आणि फेका ही नीती सर्वच राजकीय पक्ष अवलंबित आहेत याचा खूप खेद वाटतो. अजून किती दिवस वर्षानुवर्ष धनगर समाज, येणार्या निवडणुकीत जागा दाखवू असे म्हणत राहणार हेच कळत नाही त्यामुळे यापुढे ठोस कृती होणे गरजेचे आहे. नाहीतर यांच्यापेक्षा ते बरे होते असंच म्हणत अजून किती वर्षे लोटतील हे सांगता येणार नाही अशी ही तीव्र भावना समाजातील जानकर मंडळींनी व्यक्त केल्या आहेत.