’तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन : तृतीयपंथीयांच्या प्रश्नाबाबत परिषदेत सकारात्मक चर्चा!

पुणे(मा.का.): मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ’तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, चित्रा वाघ, झैनब पटेल, श्रीगौरी सावंत, सलमा खान आदी उपस्थित होते.
  खासदार सुळे म्हणाल्या, तृतीयपंथीयांचा लोकशाहीतील सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. तृतीयपंथीयांच्या प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने ही परिषद महत्वाची ठरणार आहे.
  चित्रा वाघ म्हणाल्या, तृतीयपंथीयांच्या बाबत आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या समुदायाचे प्रश्न आपण आपले प्रश्न म्हणून मांडणे गरजेचे आहे.
  मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत दिव्यांग तसेच तृतीयपंथीय यांचा सहभाग वाढावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. सुरूवातीच्या कालावधीत सुमारे 1300 तृतीयपंथीय मतदार होते, आता ही संख्या 4 हजारापर्यंत आहे. मतदान प्रक्रियेत या घटकाचा सहभाग वाढयला हवा. तृतीयपंथीयांच्या मूलभूत प्रश्नांवर उपाय शोधण्यासाठी सर्व विभागांचा सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
  मानसीक बदल आणि संवादाच्या माध्यमातून तृतीयपंथीयांना समजून घेण्याच्या प्रक्रीयेद्वारे त्यांना मुख्य प्रवाहात घेणे अधिक सोपे जाईल. पोलीस विभागाकडून तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त गुप्ता यांनी सांगितले.
  प्र-कुलगुरू डॉ. सोनावणे म्हणाले, निसर्गामध्ये एकरूपता पहायला मिळते. मानवी जीवनात भेद निर्माण झालेले दिसतात. असे प्रश्न सोडविण्यासाठी अशा परिषदेच्या माध्यमातून विचारमंथन होणे महत्वाचे आहे.
  झैनब पटेल म्हणाल्या, राज्यात 4 हजारावर तृतीयपंथीय मतदार आहेत, ही संख्या वाढायला हवी. यासाठी तृतीयपंथीय समूदाय सर्वतोपरी सहकार्य करेल. यावेळी श्रीगौरी सावंत, सलमा खान यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला विविध शासकीय विभागाचे अधिकारी, तृतीयपंथीयांसाठी काम करणार्‍या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!