अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): वरच्या पातळीवरच्या राजकारणातील घडामोडींमुळे नगरपरिषदांच्या निवडणुकीतील आरक्षणे घडत बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचे काही का होईना,शहरातील दोन्ही प्रस्थापित राजकीय पक्षातील नगराध्यक्षपदे भूषविलेले, ताकदीचे नेते, कार्यकर्ते बाजूला जात, एकत्र पॅनल उभा करुन निवडणूक लढवणार असल्याची चिन्हे इंदापूरात दिसत आहेत.त्यामुळे राजकीय समीकरणाला मुळापासून हादरा बसण्याची शक्यता आहे.
सुमारे पंधरा वर्षे इंदापूर नगरपरिषदेची सत्ता हर्षवर्धन पाटील यांच्या गटाकडे आहे. अशोक इजगुडे नगराध्यक्ष असताना त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी स्वच्छता विषयक कामांमध्ये पारितोषिके मिळवण्याचा पायंडा पाडला. तो मागील पाच वर्षांच्या काळात नगराध्यक्षा असणार्या अंकिता शहा यांनी पुढे कायम ठेवत नगरपरिषदेला राज्य व राष्ट्रीय पातळीवरची सलग चार पारितोषिके मिळवून दिली.
या दोन्ही नगराध्यक्षांनी सर्व नगरसेवक, नगरपरिषदेचे कर्मचारी यांना एकत्र घेऊन काम केले. कोणत्या ही माणसाकडे असलेल्या कौशल्याचा खुबीने वापर करुन लोकांच्या भल्यासाठी असणारी कामे यशस्वी करण्यात त्यांचा हातखंडा होता.याचा अनुभव इंदापूरातील जनतेला आला आहे.
मधल्या काळात भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये काही ही आलबेल चाललेले नाही. नगरपरिषदेवर सकृतदर्शनी भाजपची सत्ता असली तर नगराध्यक्षा असणार्या अंकिता शहा व भरत शहा व मुकुंद शहा याची विचारसरणी मूळची कॉंग्रेसची आहे. किंबहुना हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपप्रवेशास पहिल्यांदा व ठाम विरोध मुकुंद शहा यांनी केला होता, हे सर्वज्ञात आहे. केवळ अन्य केवळ इंदापूरकरांसाठी काम करायचे याकरिता त्यांनी भाजपच्या सत्ताकाळात त्यांचे ही उंबरे झिजवले आहेत. नंतरच्या काळात इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळात मुकुंद शहा यांच्या असण्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावेळी मुकुंद शहांच्या प्रतिष्ठेसाठी भरत शहा यांनी आपल्याकडे असणार्या सर्व पदांवर पाणी सोडले होते. त्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी कौटुंबिक कारणासाठी शहा कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यावेळी शहा बंधु राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उडाल्या होत्या. या नाट्यानंतर हर्षवर्धन पाटलांकडून दिलजमाईचा निरोप घेवून शहांच्या भेटीला गेलेल्या सराटी येथील एका बड्या नेत्याने पाटील यांच्या वतीने त्यावेळी शहा कुटुंबियांना जो शब्द दिला होता. तो शब्द पाटील यांच्याकडून पाळला गेला नसल्याने पाटील व शहा बंधूंमधील दुभंग आज ही कायम आहे. त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होणार आहे.
तर दुसरीकडे एकाच गटाला निधी देवून खुष केले जाते हा दावा करुन शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आमदार दत्तात्रय भरणे विरुध्द जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे ही गट धुसफूस करत नांदत आहेत. हे चिन्ह त्यांची ही चिंता वाढवणारे आहे.
या पार्श्वभूमीवर अशोक इजगुडे व भरत शहा हे दोन्ही दिग्गज बाजुला पडून एकत्रितपणे इंद्रेश्वर पॅनलची स्थापना करत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून शहरात होत आहे. या पॅनलला सराटी येथील तो बडा नेता, पिंपरी चिंचवडमधील ’ताई’ यांचे भक्कम पाठबळ लाभणार आहे. या खेरीज राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमधील एकाधिकारशाहीला कंटाळलेल्या व ज्यांच्यामागे लोकांचे बळ आहे असे शहरातील क्रियाशील कार्यकर्ते त्यांच्यासमवेत जाणार असल्याचे ही बोलले जात आहे.
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण कोणत्या ही वर्गासाठी पडले तरी ओबीसी वर्गातून अशोक इजगुडे, सर्वसाधारण गटाकडे नगराध्यक्षपद असेल तर भरत शहा यांचे नाव निश्चित असणार आहे. त्यांच्या समवेत शहरातील सर्व स्तरातील कार्यकर्ते असणार आहेत, त्यामुळे अनुसूचित जाती जमातीचे आरक्षण जाहीर झाले तरी उमेदवार ठरवण्याचा अधिकार या दोघांनाच असणार आहे. परिणामी दोघांनी निश्चित केलेला माणूस नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे इंदापूर नगरपरिषदेवर आपल्या विचाराची माणसं आणण्यासाठी, ऐन निवडणुकीच्या काळात भाजप,राष्ट्रवादी कॉंग्रेस असो की बहुजन मुक्ती पार्टी असो,या सर्वांना नव्या पॅनलशी चर्चा करावी लागणार हे निश्चित आहे.