बारामती(वार्ताहर): भारत देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्त चंद्रमणीनगर येथील बुद्ध विहार येथे माजी नगरसेविका आरती गव्हाळे (शेंडगे) यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
चंद्रमणी नगर येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब (तात्या) भोसले यांच्या पत्नी सुमन भोसले, मा. मुख्याध्यापिका आशा(आक्का) शिंदे (सोनवणे) व माजी मुख्याध्यापिका विजया (जीजू) भोसले यांच्या शुभहस्ते चंद्रमणी नगर हाऊसिंग सोसायटी मधील नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी महिला, लहान मुले मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून सर्वत्र अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत. चंद्रमणी नगर येथे यापूर्वी ध्वजारोहणाचा कार्यक्रम कधीही घेतला गेला नव्हता परंतु हर घर तिरंगा या अभियानंतर्गत सौ.आरती गव्हाळे यांनी येथील सर्व नागरिकांना ध्वजाचे वितरण केले. तसेच प्रथमत:च सार्वजनिकरीत्या ध्वजारोहण करण्यात आले.
लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आला. ध्वजारोहण करणार्या सर्व महिला यावेळी अतिशय भावूक झाल्या होत्या. आपण देशाचे खूप काही देणे लागतो आणि आपल्या सर्वांच्या मनात देशासाठी बलिदान दिलेल्या त्याग केलेल्या वीरांच्या स्मृती जागृत असणे आवश्यक आहे सोबतच देशप्रेमाची जाज्वल्य भावनाही कायम असणे आवश्यक आहे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.