मएसोच्या देशपांडे विद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न
बारामती(वार्ताहर): विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता अन्य क्षेत्रात नावलौकीक मिळवून शाळेचे, देशाचे नाव उज्वल करावे असे प्रतिपादन मएसो संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर यांनी केले.
मएसो च्या कै.ग.भि. देशपांडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारामती या विद्यालयातही भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सैनिक सुदाम साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशभक्तीपर गीते सादर करून आजच्या दिवशी वाढदिवस असणार्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
पुढे बोलताना अंबर्डेकर म्हणाले की, आपला स्क्रिन टाईम कमी करून तो वेळ खेळासाठी द्यावा म्हणजे भविष्यात या विद्यालयाचा एक तरी विद्यार्थी ऑलिम्पिक वीर होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
माजी सैनिक सुदाम साळुंखे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, 75 वर्षांपूर्वी याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाला ही आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. भारत भूमीवर भारताचे रक्षण करण्यासाठी आजही अनेक सैनिक लढा देत आहेत, त्यांच्याप्रती आपण नेहमी अभिमान बाळगायला हवा तसेच कोणत्या ना कोणत्या माध्यमातून देशाची सेवा करावी असे विचार त्यांनी व्यक्त केले.
मुख्याध्यापक उमेद सय्यद मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अविकसित असणारा आपला देश आज विकसनशील देश होवून वेगवेगळ्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करू पाहत आहे. शाळेचा नावलौकिक असाच वाढत राहिला तर जसे ’घर घर तिरंगा ’ या प्रमाणे ’घर घर एमईस ’ निर्माण होईल.
या कार्यक्रमास प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भाऊसो बडदे,पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ.अनिता तावरे, उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक राजाराम गावडे, चंदु गवळे, शेखर जाधव तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडाशिक्षक दादासाहेब शिंदे यांनी केले.