बारामती(वार्ताहर): मुलांकडून मानसिक, शारीरिक प्रश्र्नांवर पालकांनी वेळोवेळी उत्तरे देणे गरजेचे असल्याचा मौलीक सल्ला ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्र्वस्त सौ.सुनंदावहिनी पवार यांनी पालकांना दिला.
देशाच्या 75 व्या अमृतमहोत्सव स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनइर कॉलेजच्या नवीन इमारतीतील पहिला ध्वजारोहण समारंभा प्रसंगी सौ.पवार बोलत होत्या.

पुढे बोलताना सौ.पवार म्हणाल्या की, मुलांनी उपस्थित केलेल्या प्रश्र्नांना तुम्ही उत्तरे नाही दिली तर मुलं खोटं बोलतात, चुकीचे पुस्तकं, चुकीचे मित्र व फिल्म बघून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत असतात व अभ्यासावर दुर्लक्ष करतात असेही त्या म्हणाल्या.

भारताच्या स्वातंत्र्याचा 75 अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपला भारत देश व देशवासी जवानांमुळे सुरक्षित आहे हे विसरता कामा नये. 75 वर्षात आपण प्रगती व विकासाचा खूप मोठा पल्ला गाठला आहे. सर्व जाती, धर्मांना बरोबर घेऊन एकत्र काम व प्रगती केली हे खूप मोठे वैशिष्ट्य आहे. सर्वांचे योगदान महत्वाचे आहे. यापुढेही आपण सर्व एकत्र राहणार आहोत, एकत्र काम व प्रगती करणार आहोत यामध्ये कोण फूट पाडत असेल तर अशा प्रवृत्तीला विरोध केला पाहिजे.
समाजात काम करताना जाती धर्माचा लेबल लावून कोणताही द्वेष वाढवायचा व पसरावयाचा नाही तर माणुसकीच्या दृष्टीकोनातून संस्कार पेरण्याचे काम केले पाहिजे. आपली कृती पाहुन मुले अनुकरण करीत असतात. त्यामुळे आपण जे पेराल ते उगवणार आहे. येणार्या काळात मुलांना आपण काय द्यायचे ते पालकांनी ठरविले पाहिजे.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगाच्या आधी मुलांवर पालकांचा धाक होता. मात्र सध्या माहिती तंत्रज्ञानामुळे दूरदर्शन, टी.व्ही, एन्रॉड फोन, इंटरनेट आले. मागील पिढीला जे करायला व पहायला 15 वर्ष लागली ती मुले 7 वर्षात अनुभवत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे फायदे खुप आहेत पण तोटेही तेवढेच आहेत यामध्ये पालकांची भूमिका महत्वाची आहे. फोनवर आपला मुलगा काय बघतो, करतो व तुम्ही किती गोष्टी लॉक केल्या आहेत याचे भान पालकांना नसेल तर ही पिढी चांगली तरी बनेल नाहीतर बिघडत व वाहत जाईल. त्यामुळे मुलांना ज्या वयामध्ये काय करायचे आहे याची जाणीव करून दिली पाहिजे. सध्याच्या युगातील मुलांकडून पालकांनी अपेक्षा करू नका.
पवार कुटुंबियांनी पर्यावरणावर खुप काम केले आहे लाखो झाडे लावली आहेत. या झाडांची सावली आम्हाला मिळेल याचा विचार कधीही केला नाही. सध्या पाणी आडवा, पाणी जिरवा यावर काम सुरू आहे. प्लॅस्टिक, कचरा मुक्त परिसर असला पाहिजे ही काळाची गरज आहे. कोव्हीड गेला पण कोव्हीड सदृश्य काही आजारांचे आजही साम्राज्य आहे. यामुळे मुलं व कुटुंबातील व्यक्ती सतत आजारी पडत आहेत. सध्याची पिढी वाढविताना संवेदनशिलता बाळगावी लागत आहे.
शाळेचे बांधकाम व परिसर पाहुन सौ.पवार यांनी शुभेच्छा दिल्या व येणार्या काळात आनंददायी शाळा शिक्षण राबविण्याची गरज आहे.
यावेळी शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनइर कॉलेजचे अध्यक्ष आलताफ सय्यद, उपाध्यक्ष परवेज सय्यद, सचिव सुबहान कुरैशी यांनी आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बा.न.प.शिक्षण मंडळाचे माजी सभापती कमरूद्दीन सय्यद यांनी केले. सुत्रसंचालन राहिन सय्यद यांनी केले.
झेंडावंदनानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या अंगी असणार्या कला, गुणांचे प्रदर्शन केले. यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी बहुसंख्य पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमैय्या मुलाणी, सौ.भाग्यश्री लोखंडे, सौ.सोनाली इंदलकर, सौ.रूपाली बारवकर, सौ.प्राची जमदाडे, सौ.स्नेहल नायकुडे, सौ.तृप्ती सातव, सौ.राहिन सय्यद, सौ.निलोफर मोमीन, अमोल पारधे, इम्रान पठाण व गिरीष लोणकर या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.