अशोक घोडके यांजकडून….
इंदापूर(प्रतिनिधी): कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. बिजवडी कारखान्यावर आज देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते अत्यंत उत्साहामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्व उपस्थितांना संबोधित करताना प्रथमत: देशाला स्वातंत्र्य मिळणेकामी ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिले त्यांना अभिवादन केले. देश घडविण्यामध्ये सैनिक व कष्टकरी कामगारांचा मोठा वाटा आहे. देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा हे अभियान राबवून पुर्ण देशाला एका छताखाली आणले. वर्षानुवर्षे चालणारे देशांतर्गत वादविवाद शांतीचे मार्गाने मिटविले. स्वातंत्र मिळालेनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची राज्यघटना तयार केली व देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा व मतदानाचा अधिकार मिळाल्याने समानता आली, सर्वांना शिक्षण घेता आले. इतर देशामध्ये विविध समस्यांमध्ये वाढ होत असताना त्या उलट भारत देशामध्ये प्रत्येक गरीब नागरिक स्वयंपूर्ण होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया मिशनमुळे देशाच्या विकासाला चालना मिळाली.
स्वातंत्र्यामुळे विकासाच्या पायाभूत सुविधा निर्माण करता आल्या. आज देश विविध पातळयांवर स्वयंपूर्ण होत आहे, साखर, अन्नधान्य निर्यात करीत आहे. आज आपले उजनी धरणामुळे वर्षाकाठी जवळपास 5 हजार कोटी रुपयाचे उत्पन्न तयार होते. या उजनी धरणनिर्मितीमध्ये कर्मयोगी शंकररावजी पाटील ऊर्फ भाऊंचा मोठा वाटा आहे. यामुळे इंदापूरच्या विकासाला अधिक चालना मिळाली. असे यावेळी त्यांनी नमुद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी केले. या कार्यक्रमास कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, ऊस उत्पादक सभासद, ऊसतोडणी कंत्राटदार, कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.