शैक्षणिक चळवळ यशस्वी करण्यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य मोलाचे – विरोधी पक्षनेते, आ.अजित पवार

बारामती(वार्ताहर): शैक्षणिक चळवळ यशस्वी करण्यासाठी शाळा, शिक्षक, विद्यार्थी व चांगले पालक यांचे सहकार्य मोलाचे असते असे मत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते आ.अजित पवार यांनी व्यक्त केले.

शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए. इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्युनइर कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आ.पवार बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि मुस्लीम को-ऑप बँक लि. चेअरमन डॉ.पी.ए.इनामदार होते.

यावेळी बारामती ऍग्रो लि.चेअरमन राजेंद्र पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव शेख सुब्हानअली, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मा.नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, आयएसएमटीचे अध्यक्ष किशोर भापकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष हाजी सोहेल खान, बारामती बँकेचे ज्येष्ठ संचालक ऍड.गिरीष कुलकर्णी इ. मान्यवर उपस्थित होते.

पुढे आ.पवार म्हणाले की, आपला देश व समाज सुखी, समृद्ध व सुसंस्कृत घडण्यासाठी चांगल्या शाळा, कॉलेज उभे राहिले पाहिजेत आणि चांगला माणूस घडणेसाठी शिक्षण महत्वाचे आहे.

बिलगेटस्‌चे उदाहरण देत पुढे बोलताना श्री.पवार म्हणाले की, गरिबीत जन्म घेतला म्हणून शिक्षण न घेता चालणार नाही उलट शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात ज्ञान संपादन केल्यास तो जगतावर राज्य करू शकतो. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर अशा संस्थांना महाराष्ट्रामध्ये तोड नाही. प्रत्येकाने दर्जा राखण्यासाठी उत्तम प्रयत्नांची शिकस्त केली पाहिजे. महात्मा फुले, कर्मवीर आण्णा इ. सारख्या बहुसंख्य महापुरूषांनी सुद्धा शिक्षणाचे महत्व व त्याची ताकद दाखवून दिली आहे. शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे ते पिल्यावर गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. शिक्षणामुळे चुक किंवा बरोबर कळते न्याय व अन्यायाविरोधात लढण्याचे बळ मिळते असेही ते म्हणाले.

बारामतीत मुस्लिम समाजासाठी महाराष्ट्रात नसेल असा शादीखाना बांधत आहोत. बारामतीसह जिल्ह्यात वेगवेगळ्या पद्धतीने बदलण्याचे काम करत आहोत. राज्य सरकार वर बोलताना ते म्हणाले आजतगायत खातेवाटप करता आले नाही. कुटं घोडं पेंड खातय कळत नाही असाही टोला त्यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण यांनी जो मंगल कलश आणला तेव्हापासुन म्हणजे 1960 पासुनअसे कधी घडले नाही ते राज्याच्या राजकारणात घडले व पहावयास मिळाले याची नोंद सुज्ञ नागरीकांनी घेतली पाहिजे.

आपल्या देशात पहिली मुलींची शाळा सुरू झाली तर मुलींना सक्तीची शाळा सुद्धा महाराष्ट्रात राबविण्यात आली. राईट टू एज्युकेशन आणले. येणार्‍या काळात विद्यार्थी केवळ ज्ञानाने संपन्न होता कामा नये तर ज्ञानाने, गुणाने, विचाराने, कौशल्यानेव चारित्र्याने संपन्न झाला पाहिजे. शाळेतील शिक्षकांना उत्तम प्रतीचे इंग्रजी बोलता आले पाहिजे इंग्रजी काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पुढे आ.पवार म्हणाले की, समाजात वावरत असताना मुस्लीम मुलींना दर्जेदार शिक्षण दिल्यास इतक्या मुली मेरीटमध्ये येतात त्याबद्दल अभिमान वाटतो असेही ते म्हणाले. शिक्षणात स्पर्धा असली पाहिजे. पाहिजे त्याला शैक्षणिक परवानग्या मिळवून देऊ पण दर्जा घसरता कामा नये.

बारामतीतील नागरीकांसाठी विकास केला आहे. बारामतीकरांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. रस्ता ओलांडताना विरूद्ध दिशेने जाऊ नये व कुठेही अतिक्रमण करू नये. या शाळेतून उत्तम दर्जेदार पिढी बाहेर पडावी व स्वत:च्या पायावर उभी रहावी शेवटी अशी आशा व्यक्त केली.

यावेळी शेख सुब्हानअली सर, हाजी सोहेल खान, प्रदीप गारटकर, डॉ.पी.ए. इनामदार इ. शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए.इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्युनइर कॉलेजचे अध्यक्ष आलताफ सय्यद, उपाध्यक्ष परवेज सय्यद व सचिव सुबान कुरेशी यांनी केले.

कार्यक्रमा दरम्यान मुस्लिम बँकेच्या नवनिर्वाचित चेअरमन, व्हाचेअरमन व सदस्यांचा आ.अजित पवार यांच्या शुभहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. इमारतीचे बांधकाम करणारे डी.के.सिनकर, कुलदिप निकम व ज्यांच्या देखरेखीखाली या इमारतीचे काम झाले त्या नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम आलताफ सय्यद यांचा सुद्धा सत्कार राज्याचे विरोधी पक्ष नेते आ.अजित पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बारामती नगरपरिषदेचे शिक्षण मंडळाचे माजी सभापती हाजी कमरूद्दीन सय्यद यांनी केले. तर शेवटी आभार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुमैय्या मुलाणी यांनी मानले.

यावेळी बहुसंख्य नागरीक, विद्यार्थी, पालक, मित्र परिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

हे कर्तव्य आहे, उपकार नव्हे – शिक्षणमहर्षी, डॉ.पी.ए.इनामदार

उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.पी.ए.इनामदार म्हणाले की, मी या संस्थेला 1 कोटी रूपये दिले ते माझे कर्तव्य आहे, उपकार नव्हे. सर्व धर्मात ईश्र्वराने सांगितले आहे तू माझ्याकडे एक पाऊल टाक मी तुझ्याकडे दहा पाऊले टाकेन. मी ईश्र्वराशी बिझनेस करत आहे. त्यांच्या आदेशाचे पालन करून कृती केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आज मी जी रक्कम याठिकाणी दिलेली आहे त्याच रक्कमेच्या दहा पट रक्कम मिळाली आहे. गोर-गरीबांच्या मुलांना मदत केल्यास मोठ्या प्रमाणे आपल्याला सुद्धा मदत होते व पैसा सर्वबाजुने येतो. आपणही दान-धर्म करण्यास सुरूवात करा असेही त्यांनी उपस्थितांना सल्ला दिला.
शिकण्याची व शिकवण्याची पद्धत बदलेली आहे. ही पद्धत डोळ्यासमोर ठेवून शिक्षण दिले पाहिजे. यापुढे विद्यार्थ्यांना लिहिता आले नाही तरी चालेल उत्तम इंग्रजी बोलता आले पाहिजे. मोबाईलवर सर्व काही तुमच्या हाती मिळत आहे. संगणक साक्षरता लहानपणीत मिळाले पाहिजे. आमच्या आझम कॅम्पसमध्ये 5 वर्षाची मुले संगणक बनवतात. गरिबी अपवाद असू शकत नाही, गरिबीवर मात करता आली पाहिजे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात पुढाकार घेतला पाहिजे.
डॉ.बाबासाहेबांच्या पुर्वीचा भारत व नंतरचा भारतात खुप बदल झालेला आहे. 1950 साली मुली 1 टक्का शाळेत जात होत्या. आजमितीस 77 टक्के मुली शिक्षण घेत आहे यास राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य महत्वाचे आहे. नकारात्मक कधीही बोलू नका अशी शपथ सर्वांनी आज घ्या. मी केल्याशिवाय राहणार नाही असे बोलण्याची सध्या गरज आहे असे सांगितले.
आज या जागेत ज्युनइर कॉलेज सुरू झाले आहे ुपुढील काळात सिनइर कॉलेज झाल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वसमावेशक विचार कुठून सुरू होतो तर तो बारामतीतून सुरू होतो असेही त्यांनी गौरोद्गार काढले.

याला म्हणतात जिद्द व चिकाटी….
आलताफ सय्यद यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभाग बारामती शहराच्या अध्यक्ष पदापासून सुरू झालेला प्रवास तो आता ज्युनइर कॉलेजवर येऊन थांबला आहे. एकनिष्ठेने तन-मन व धनाने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम केले. गरजु समाजातील लोकांना शिर्रर्खुमा पदार्थांचे वाटप केले. त्याचे फळ म्हणून एकता महिला पतसंस्था उभारली ती पतसंस्था गगनभरारी घेत आहे. त्यानंतर युनिटी हेल्थ क्लब, मुस्लिम बँकेचे संचालक, एकता इंग्लिम मिडीयम स्कूल, आलताफ सय्यद यांच्या सुविद्य पत्नी सौ.तरन्नुम सय्यद यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष पदे भूषविली. या सर्व प्रवासात आलताफ सय्यद यांचे मामा माजी सभापती कमरूद्दीन सय्यद व त्यांचे मामे भाऊ परवेज कमरूद्दीन सय्यद यांची खंबीर साथ मिळाली व मिळत आहे. आलताफ सय्यद यांचा मित्र परिवार त्यांच्या यशासाठी सतत झगडत असतात त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. यातून एक शिकायला मिळते नावं ठेवणारी राहिली मागे, आलताफ सय्यद गगन भरारी घेत गेले पुढे… म्हणून एक म्हण आहे ती सर्वांच्या जीवनात यश प्राप्तीसाठी लागू पडते… निंदनाचं घर असावे शेजारी!

पी.ए.इनामदार यांची जबरदस्त शिक्षण संस्था आहे असे म्हणून त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ.पी.ए. इनामदार एकता इंग्लिश मिडीयम स्कूल ऍण्ड ज्युनइर कॉलेजच्या नूतन इमारतीस 1 कोटीचा निधी दिल्याबद्दल त्यांचे तमाम बारामतीकरांच्या वतीने हार्दिक अभिनंदन! – विरोधी पक्षनेते आ.अजित पवार

समाजाच्या वतीने दादांचा सत्कार…
मा.उपमुख्यमंत्री, आ.अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे ओबीसींना आरक्षण मिळाले बद्दल त्यांचा मुस्लिम समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!