अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(प्रतिनिधी): नुकत्याच झालेल्या वरकुटे बु।। ग्रामपंचायत निवडणूकीत कोणत्याही उमेदवाराने कोणत्याही पक्षाची माळ गळ्यात न घालता निवडणूक लढवली. मतदारांनी सुद्धा कामाचा माणूस म्हणून उमेदवार निवडून दिले. मात्र, सद्यस्थितीला निवडून आलेल्या सदस्यांची अवस्था आगीतून निघून, फुफाट्यात पडल्यासारखी म्हणजे निवडणूकीच्या संकटातून बाहेर पडून दुसर्या संकटात सापडल्या सारखी झालेली आहे.
ग्रामपंचायत निवडणूकीत जो उमेदवार उमेदवारी लढवित असतो त्याच्या समोर गावचा विकास असतो, ते उद्दीष्ट घेत निवडणूक लढवित असतो. इंदापूर तालुक्यात दोन बलाढ्य राजकीय वरदहस्त असताना वरकुटे बु।। ग्रामपंचायत निवडणूकीत कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करता पॅनेल उभे राहिले आणि मतदारांनी ज्यांना पाहिजे त्यांना निवडून दिले. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांसमोर सद्यस्थितीत द्विधा परिस्थिती निर्माण झालेली आहे. गावच्या विकासासाठी कोणाचा झेंडा हाती घ्यावा.
गावच्या विकासासाठी दोन्ही राजकीय हस्तकांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांनी गावच्या विकासासाठी दोघांकडे जावे लागले तरी चालेल विकास महत्वाचा आहे अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू होती.
शनिवार दि.6 ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत वरकुटे बु।। च्या दोन्ही गटातील विजयी नवनिर्वाचित सदस्यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेतली. भरणे यांनी या उपस्थितीत सर्व सदस्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी भरणे म्हणाले, या तालुक्याचा आमदार या नात्याने तुमच्या गावाला कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडून देणार नाही. यापूर्वी गावाच्या विकासासाठी मोठा निधी दिला असून येणार्या काळातही चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले.
यावेळी नितीन सोनवणे,राहुल घुले,रवींद्र देवकर,लक्ष्मण चीतळकर,अशोक शिंदे,सचिन करे,हरिदास करे,दिलीप देवकर व नवनाथ चितळकर उपस्थित होते.