शिवसेनेचे मंत्री व आमदार पक्षश्रेष्ठींना न सांगता जर इतर पक्षाकडे जावून बंडखोरी करीत असतील तर हेच शिवसेनेचे बाळकडू का? मुंबई म्हटलं की, शिवसेना आणि शिवसेना म्हटलं की, मुंबई असे एक समीकरण असणारे शिवसेनेचे तत्व, विचार धूळीस मिळविण्याचे काम शिवसेनेची पायेमूळे रोवणार्यांनी केले असेल तर शिवसेनेचे संस्थापक वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार जर कोणी शिवसेनेचा आमदार इतर पक्षाकडे गेला, बंडखोरी केली तर त्याला रस्त्यात ठेचून मारा असा त्यांचा थेट इशारा होता.
आज एकनाथापासून इतर सर्व मंत्री, आमदार जर इतर पक्षाकडे जात असतील तर यांना रस्त्यात कोण ठेचून मारणार किंवा यांना यांची जागा कोण दाखवून देणार हा खरा प्रश्र्न उपस्थित झालेला आहे. या लोकांनी एवढा मोठा पक्षाशी घात केला, का? कोणाच्या सांगण्यावरून केला हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. एकनिष्ठा काय असते हे बाळासाहेबांच्या शिवसेनेतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांवरून दिसते. ती एकनिष्ठा मातीमोल करणार्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे जनता लक्ष देवून आहे.
बाळासाहेब ठाकरेंचा एवढा दबदबा होता ते त्यावेळी मुख्यमंत्रीच काय तर देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा झाले असते मात्र, त्यांनी हातातील कमांड कधी सोडली नाही. कितीही ऊन, वारा, पाऊस आला ते कधीही डगमगले नाही. पदाच्या, प्रतिष्ठेच्या मोहापायी उलट-सुलट निर्णय घेतला नाही. तत्वनिष्ठ राहिले. कडवा हिंदूत्ववाद त्यांच्यामधून पहावयास मिळाला.
आज उद्धव ठाकरे, राज ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबिय म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे अनुकरण करीत समाजात काम करीत आहोत. बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे मातोश्रीवर नानाप्रकारचे राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, आमदार यांना येण्यास भाग पाडले तशी कृती आज ठाकरे कुटुंबियांमध्ये दिसून येत नाही. माणसाने शांत असावे मात्र, अशांतता होईपर्यंत मुग गिळून बसू नये असाच काहीसा प्रकार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर झालेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेला निर्णय म्हणजे ठाम होता. त्यामध्ये काही झाले तरी बदल होत नव्हता. मात्र, सध्या ठाकरे कुटुंबिय इतरांचे ऐकून कृती करीत असतील तर याला बाळासाहेबांची शिवसेना म्हणता येईल का?