प्रत्येक गावात ग्रामदैवत असते मग ते हिंदू असो किंवा मुस्लिम त्या ग्रामदैवताची आराधना सर्व गावातील नागरीक मोठ्या उत्साहाने एकत्रीत येऊन मिळून, मिसळून मनातील राग,द्वेष, मत्सर बाजुला ठेवत उत्सव दिमाखात कसा साजरा होईल व ग्रामदैवत कसा प्रसन्न होतील याकडे प्रत्येक नागरीकाचे लक्ष लागून असते. या उत्साहात हौसे,नौसे व गौसे सुद्धा येत असतात. मात्र, ग्रामदैवताचा उत्सव संपन्न झालेनंतर काही नागरीकांच्या पदरी दु:ख यातना येतात तर काहींच्या पदरी सुख,समृद्धी येते. त्यावेळी दु:खी मंडळी ग्रामदैवताला काही चुकलं माकलं असेल तर माफ कर म्हणजे एक प्रकारे साकडं घालतात पण शेवटपर्यंत त्यांची भक्ती कमी करत नाही.
असाच राजकीय काहीसा प्रकार बारामती येथील मुख्य चौकातील मंदिराचा आहे. बारामती नगरपरिषद पंचवार्षिक निवडणूकीचा बिगुल वाजला…इच्छुक उमेदवारांच्या मनात पालवी फुटली, राजकीय, सामाजिक मित्रांजवळ हे इच्छुक इच्छा व्यक्त करू लागलेले दिसत आहे. ज्या मंदिरातून निवडणूकीचा संपूर्ण लेखाजोखा पार पाडला जातो त्या मंदिरात एक ज्येष्ठ व त्यांच्या बुद्धीमत्तेला दाद देता येईल अशी चालती बोलती मुर्ती आहे. त्या मुर्तीला मंदिरात येणारे ङ्कदादाङ्ख म्हणून संबोधतात, वडिलधारी म्हणून आदर करतात त्यांच्या शब्दाला मान,सन्मान देतात. निवडणूक लागली म्हटल्यावर हे मंदिर उत्सवाप्रमाणे लोकांनी ओसंडून वाहताना दिसणार, जो नाही तो या चालत्या बोलत्या मुर्तीला कुठं ठेवू..कुठं नाही असे करणार काही जण तर झोपीत सुद्धा दादा…दादा…म्हणून चावळतात म्हणे. कारण या मंदिरातील चालत्या बोलत्या मुर्तीवर महादेवाचा हात आहे. या मुर्तीने महादेवाशी इमाने इतबारे, चोख स्वच्छ आरश्याप्रकारे व्यवहार केला त्यामुळे त्या महादेवाची या मुर्तीवर गाढा विश्र्वास आहे हे कोणीही नाकारू शकणार नाही.
बारामती नगरपरिषदेचा संपूर्ण अभ्यासच नाही तर त्यावर पीएच.डी.च्या पुढचं पाऊल म्हटलं तरी चालेल अशी माहिती या मुर्तीच्या 3 पौंड वजनाच्या मेंदूत ठासून भरलेली आहे. सध्याच्या प्रचलित साठवणूकी यंत्र सुद्धा या मेंदूसमोर कमी पडेल. नगरपरिषदेच्या निवडणूकीचा संपूर्ण ढाचा तयार करून महादेवासमोर ठेवणे पण काहींच्या मते ही मुर्तीच सगळं करते, निर्णय घेते. मुर्तीच्या हातात जर सगळं असते तर महादेवाची गरज काय?
निवडणूकीच्या काळात हे मंदिर भरगच्च भरणार, लोकांची आवक-जावक सुरू राहणार, राजकीय उत्सव म्हटल्यावर हौसे,नौसे व गौसे येणार टाळ्यावर टाळी देणार, स्वत:च्या मनातील किस्से सांगणार, मुर्तीला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार या मुर्तीने आतापर्यंत कित्येक मुर्त्या घडविल्या त्यांना आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, निवडणूका झाल्या की काही कालावधीतच घडणार्या मुर्त्या याच मुर्तीला नावे ठेवण्याचे काम करतात, टोपन नाव देण्यास सुरूवात करतात. जर तुम्हाला या मुर्तीच्या कामाबाबत बोटच दाखवायचे होते तर निवडणूकीच्या काळात मंदिराच्या पायर्या का झिजवल्या, त्यांच्या पुढे..पुढे का केले त्यांच्या मनधरणीसाठी नाही ते केले मग निवडणूकीनंतर मुर्तीच्या एवढा म्हणजे 3 पौंडचा तुमचा असणारा मेंदू कुठे गहाण ठेवला होता का? याचा विचार करण्याची गरज आहे.
या मुर्तीच्या महादेवाजवळ कित्येकांनी गार्हाणे गायिले, तक्रारी केल्या यावर महादेवाचे एकच म्हणणे आहे पर्यायी माणूस उपलब्ध करून द्या त्वरीत मुर्तीत बदल करू. एवढ्या विकसीत बारामतीत या मुर्ती एवढी बुद्धी विकसीत कोणाची झाली नाही. ज्यांच्याकडे बुद्धी आहे ते दुसर्यांची बुद्धी नाशवंत करण्यामध्ये स्वत:ची बुद्धीचा वापर करीत आहेत ही खूप खेदाची बाब आहे.
राजकीय उत्सव जरी संपला तरी या मुर्तीवर येणार्यांनी कोणाच्या सांगण्यावरून किंवा ऐकण्यावरून या मुर्तीला नावे ठेवू नका कारण ही मुर्ती महादेवाला विचारलेशिवाय त्यांचा आशिर्वाद घेतल्याशिवाय पुढचे पाऊल उचलत नाही हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. या तत्वनिष्ठ मुर्तीला तुम्ही नाराज केले तर मुर्ती नाराज होणार नसून महादेव नाराज झाल्यासारखे होईल. ऐकावे जणाचे करावे मनाचे याप्रमाणे नव्या उमेदेने येणार्यांनी आचरण करण्याची गरज आहे. या उत्सवात मुर्तीची बदनामी करणारे पावलो पावली भेटतील, जाती-पातीचे राजकारण करतील त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता या मुर्तीचीच आराधना करा.