राजकारणासाठी कायपण…..

महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट असणारे एक विकास पुरूष (महाराष्ट्राचे केजरीवाल) आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी आपण आव्हान केले ते काम कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलिस प्रशासन माननीय. कोर्ट. सर्व बाबी तपासून करेल.

तो महाराष्ट्राचा अत्यावश्यक गंभीर प्रश्न नाही…. परंतु राजसाहेब आपण तरुणांना रोजगार, शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन करा. आपल्या रेल्वे इंजिनाला प्रगतीचा-विकासाचा डबा जोडा. जातीय द्वेषाचा फक्त धुर नको. बहुजन तरुण भरकटणारा राहीला नाही. त्यांच्या लक्षात आले आहे धार्मिक तेढ वाढवून सत्तेचा मलिदा कोण खातं आहे.

कोणाची मुलं ऐशो-आरामात प्रदेशात शिक्षण घेत आहेत तर, आमची पोरं तुमच्या आव्हानांवर जेल ची हवा का खावी??

मुंबईत काही ठिकाणी लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा सुरु केल्याच्या बातम्या येत आहेत. उद्या जर खरंच एखाद्या ठिकाणी मस्जिदीसमोर आमचे हिंदू बांधव कुठं जमा झाले तर मुस्लिमांनी कृपया चिडू नये. तर त्यांना सन्मानाने मशिदीत बोलवावं, मशिदीत खरंच नेमकं काय चालतं त्याचा परिचय करून द्यावा, अल्पोपहार, चहा द्यावा. मस्जिद परिचय संमेलन आयोजित करावे. इस्लाम स्नेह, प्रेम, मानवतेसाठी या अभियानांतर्गत कुरआनाची मराठी भाषांतरे त्यांना भेट द्यावी. या संधीचे सोनं करावे. रमजान चे दिवस आहेत. रोजा हा शांती, संयम, समानता, करुणेचा, संस्कार करतो. म्हणून कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ न देता सर्वांनी शांतता राखावी. राजकारणी जरी सोईने वागत असले तरीपण आपण मात्र देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी, सामाजिक ऐक्यासाठी जगाची महासत्ता, महागुरू होण्यासाठी आपण भारतीय नागरिक, व माणूस म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागावे. माणुसकीचा धर्म सोडू नये ही नम्र विनंती! मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना!
जय हिंद, जय भारत

  • मुनिर तांबोळी –
    मानवी हक्क कार्यकर्ता, बारामती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!