दत्तामामांची चिकाटी, पश्र्न सोडवून घेण्याची पद्धत व लोकांच्या हितासाठी वाट्टेल ते करण्यास तयार, योग्य अधिकार व सत्तेचा वापर – खा.शरदचंद्रजी पवार

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): दत्तामामांची चिकाटी. प्रश्न सोडवून घेण्याची पद्धत, काम झाल्याशिवाय उठायचे नाही आणि आपल्या भागातील लोकांच्या हितासाठी जे करायला लागेल ते करण्यासाठी लोकांनी दिलेला अधिकार आणि सत्ता याचा वापर करायचा एवढे एकच सूत्रं घेऊन ते काम करत आहेत. माझी खात्री आहे की इंदापूरचा चेहरा बदलतो आहे तो आणखी बदलल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्रजी पवार यांनी केले.

लाखेवाडी येथे जय भवानी गड शिक्षण संकुल या ठिकाणी अध्यक्ष श्रीमंत ढोले यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात खा.पवार बोलत होते.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे , पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

खा.पवार साहेब पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात 1260 कोटी रुपयांची कामी घेतली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे 90 किलोमीटर काम केले, पाणंद रस्त्याचे 1152 किलोमीटर काम केले. त्यासाठी 138 कोटी खर्च केले. जलजीवन मिशनसाठी कोट्यावधीचा आराखडा तयार केला आहे. मला वाटलं अर्थमंत्री बारामतीचा आहे तर तिकडे लक्ष असेल पण त्यांचे लक्ष इथेच जास्त दिसत असल्याचे पवार साहेब यांनी सांगितले.

अजितदादा आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या हातामध्ये देशाच्या राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचा अधिकार तुमच्यामुळे जो त्यांना मिळाला त्यामुळे पुणे जिल्ह्यात अमूलाग्र बदल होत चाललेला आहे. हे सर्व काम करणार्‍यांना नेहमी साथ देत रहा. जात-पात धर्माचे राजकारण करू नका. आज देशामध्ये जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली एक प्रकारे समाजामध्ये दुफळी कशी तयार होईल याचा प्रयत्न केला जातोय. पण याचा विचार न करता केवळ विकास आणि लोकांचा संसार, नव्या पिढीचे चित्र बदलायचे आपला भाग बदलायचा एवढे नजरेसमोर ठेवून या चांगल्या कामाला साथ द्या अशीही विनंती खा.पवार यांनी यावेळी केली.

गेल्या काही वर्षांमध्ये इंदापूरमधील लाखेवाडीला ज्यांनी या संस्थेची स्थापना केली ते श्रीमंत ढोले सर त्यांचे कुटुंबीय व सहकार्‍यांनी जय भवानीगड विकास प्रतिष्ठान स्थापन करून एक उत्तम दर्जेदार शिक्षण संकुल उभे केले याची कल्पना मला होती. हे पाहण्याची इच्छा मला होती. त्यांनीच यासाठी निमंत्रण दिले. मला आनंद आहे, आज सर्वांच्या साक्षीने या संकुलाचे उद्घाटन झाले. या संकुलामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यांना ज्याप्रकारचे शिक्षण द्यायची गरज आहे त्याची काळजी याठिकाणी घेतली आहे. आज इंग्रजी मीडइमवर वाद असतो. मातृभाषेचा अभिमान हा ठेवला पाहिजे. मातृभाषा आपल्या सगळ्यांना पुढे नेण्यासाठी मदत करते. त्यासाठी मातृभाषेची शिक्षणसंस्था ही असली पाहिजे. पण जगाच्या ज्ञानाची भाषा ही इंग्रजी आहे. जगामध्ये कुठेही गेले तरी इंग्रजीतून सुसंवाद ठेवावा लागतो. त्यामुळे या इंग्रजीशी आपण सुसंवाद ठेवाल तर त्याला जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे तितके अवघड होणार नाही. आज ते संकुल इथे उभे केले आहे त्यामध्ये श्रीमंत ढोले यांनी ज्या अनेक संस्था उभ्या केल्या आहेत त्यामध्ये त्यांनी दर्जा संभाळला आहे. यातून पुढच्या काही पिढ्या या योग्य रस्त्याने गेल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी या कुटुंबाला धन्यवाद दिले पाहीजे.

तुम्ही शेतकरी मेळावा घेऊन प्रश्न मांडले. प्रश्न आहेत त्यावर मार्गही निघू शकतो. इथल्या साखर कारखान्यात काही ठिकाणी 2700 कुठे 2800 तर कुठे 3000 प्रती क्विंटल भाव आहे. हे कधी बघितले होते का? श्री छत्रपती कारखाना जेव्हा सुरू झाला तेव्हा माझे वडील संचालक मंडळात होते. त्यावेळी कारखाना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा साखरेची किंमत ऊसाच्या मार्फत जी होती ते पाहून कारखान्याने ऊस उत्पादकांना 35 रुपये टन हा भाव दिला. शेतकर्‍यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. तो भाव आज तीन हजारावर आला आहे. कोल्हापूर येथे सगळे कारखाने तीन हजारांच्या वर भाव देतात. भाव चांगला द्यायला पाहिजे, खर्च निघाला पाहिजे आणि संसार चालला पाहिजे.

शेती मालाच्या किमतीच्या प्रश्नावर मार्ग नक्की काढू. नवनवीन पद्धती आपण करू. शेती ही आधुनिकीकरणाच्या मार्गाने केली पाहिजे. दत्तामामा यांची ही दुसरी वेळ आहे. त्यांचे सतत लक्ष मतदारसंघात असते. श्रीमंत ढोले यांनी आपल्या प्रश्नांमध्ये गावांचा प्रश्न मांडला. त्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. पण दुर्दैवाने इंदापूरच्या सहकार्‍यांचा गैरमज झाला. त्यामुळे हे काम थांबले. यासाठी अजितदादा आणि बाकी सहकार्‍यांनी मुळशी धरणाचे पाणी इथे आणता येईल का, याची पाहणी सुरू केली आहे. तो आग्रह केवळ दत्ता मामांचा आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मार्ग काढू व काहीही झालं तरी इथला प्रश्न सोडवू आणि इथल्या पाण्याची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. श्रीमंत ढोले आणि त्यांचे सहकारी यांनी राष्ट्रवादीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. तुमचा सन्मान पक्षात नक्कीच राखला जाईल व लोकांच्या भल्यासाठी तुम्ही जो प्रश्न व काम घेऊन येणार त्याला कायमच मदत केली जाईल हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खा.सुप्रिया सुळे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, मागील लोकसभा निवडणूकीत इंदापूरकरांनी मला 70 हजारांचे मताधिक्य दिले,याबद्दल मी आभारी आहे. या सर्वांनी मला लोकसभेत पाठविले, मला संधी दिली, यामुळे मला तेथे चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली. याबद्दल पुरस्कार देखील मिळाले आहेत. हे सगळे पुरस्कार आपल्या मतदारसंघातील प्रत्येकाचे आहेत. सर्व मतदारांनी जी मला संधी दिली त्याचे सोने करण्याचा माझा प्रांजळ प्रयत्न असतो.

आपल्या मतदारसंघात वयोश्री योजनेचे सर्वात मोठे काम झाले आहे. या योजनेअंतर्गत आपण ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी पडणारी उपकरणे देतो. या योजनेत आपण केलेले काम हे देशात सर्वाधिक आहे, यासाठी सामाजिक न्याय विभागाने खुप मोलाचे सहकार्य दिले.

नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे दत्तामामा भरणे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यात भरपूर विकासकामे झाली आहेत. रस्त्याची कामे अतिशय उत्तम झाली आहेत. पिण्याची पाण्याची सोय अशी अनेक कामे झाली आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन.

मामा तुम आम खाव पेड गिनो मत तुम्हाला जयंतराव व दादा पाणी देतील कुठून द्यायचे ते देतील त्यामुळे सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. त्या दोघांनी एक निर्णय घेतला असून त्या दोघांवर विश्वास ठेवा पाणी प्रश्न तुमचा लवकरात लवकर सुटेल असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. मध्यंतरी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापूरच्या पाणी प्रश्नावरून नाराज झाले परंतु लवकरच त्यांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. काही लोकांमध्ये विनाकारण गैरसमज झाले त्यामुळे तो निर्णय रद्द करावा लागला परंतु जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तो प्रश्न सोडवला आहे. लवकर तुमचा पाणीप्रश्न सुटणार असल्याचे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!