मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला देत छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा पुरावा नसल्याचा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल असं वक्तव्य एका कार्यक्रमात केलं आहे. राज्यपालांनी केलेल्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसने आक्षेप घेत निषेध नोंदवला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी औरंगाबाद दौर्यावर असताना हे वक्तव्य केले आहे.
महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटलं की तुमच्या कृपेने मला राज्य मिळालं आहे, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि.16 जुलै 2018 रोजी दिलेल्या निकालानुसार तपास अधिकार्यांनी इतिहासतज्ज्ञ आणि इतर अभ्यासकांची मते विचारात घेतल्यानंतर न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.