राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष बदलण्याची कार्यकर्त्यांची मागणी?

बारामती (वार्ताहर): माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बारामती शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षांचे काम दिसत नसल्याने पक्षातील कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

बारामती शहराचा वाढता विकास पाहता, बारामतीचा चेहरा-मोहरा बदलला आहे. विकासात्मक बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मार्फत होत असलेली कामे तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी शहराध्यक्ष कमी पडत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जात आहे.

शहरात कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आल्याचे दिसत आहे. इतर जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष पाहिले असता, त्यांचे काम पाहिले असता इतर कार्यकर्त्यांमध्ये काम करण्याची इच्छाशक्ती उदयास येत आहे.

खा.शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व लोकप्रिय खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी दिलेल्या सर्वसमावेशक, पुरोगामी विचारांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान कार्यकर्त्यांच्या मनातून ढासळत चाललेला बारामती शहरातून दिसत आहे.

संघटन नाही, मासिक बैठका नाही. कोण कुठे कार्यकर्ता राहतो त्याच्याकडे कोणते पद आहे हे पाहण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंदवही पहावी लागत असेल तर ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत. शहरातील पक्षातील कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतलेल्या नाहीत. प्रभागवार स्थानिक नगरसेवकांना घेऊन कधी बैठका नाही.

आता येणार्‍या नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान कार्यकर्त्यांना आठविण्याचे व जागे करण्याचे काम केले जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गल्ली बोळात निष्ठावंत व कट्टर कार्यकर्ते आहेत मात्र त्यांच्यापर्यंत शहराध्यक्ष कधी पोहचलेच नसल्याचेही कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत. नगरपरिषद निवडणूकीपुर्वी सक्षम असा शहराध्यक्ष मिळावा अशीही मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!