कोरोना सारख्या अदृश्य शत्रूने समाजात जगायचं कसं, वागायचं कसं आणि सुरक्षित राहिचे कसं हे शिकवले. कोरोना आलेपासून सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले. मध्यंतरी तर अफवा पसरली की, वृत्तपत्राने कोरोना पसरतो. हे ऐकल्यावर तर मनात धडकीच भरली. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेने ज्यावेळी जाहिर केले वृत्तपत्राने कोरोना होत नाही त्यावेळी कुठे दिलासा मिळाला.
कोरोना काळात ऑनलाईन वृत्त वाचकांची संख्या खुप वाढली. मोठ मोठ्या दैनिकांना सुद्धा याचा फटका बसला. नियमित दहा-पंधराच्या पटीत निघणारे साप्ताहिक, मासिक पाच ते सहावर आले. यामुळे प्रिंट मिडीया धोक्यात आल्यासारखा झाला. इले.मिडीया, सोशल मिडीया या काळात गगनभरारी घेताना दिसत होता. या सर्व प्रकारात विश्र्वासार्हता जपली ती फक्त प्रिंट मिडीयाने, आजही कित्येक वाचक वृत्तपत्र वाचल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही किंवा पुढचे कार्य करीत नाही.
सोशल मिडीया तर पापणी लवेपर्यंत नवनविन बातम्या प्रसिद्ध करीत होता. काही वेळेस सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेली बातमीची विश्र्वासार्हता काय असे काही वाचक आम्हाला बोलत होते. त्यामुळे सोशल मिडीयावर प्रसिद्ध झालेल्या बातमीपेक्षा वृत्तपत्रात आलेल्या बातमीचे विश्र्वासार्हता जास्त असते. त्यामुळे आजही मुद्रीत वृत्तपत्रे अशा बिकट अवस्थेत तग धरून आहेत.
घरातून बाहेर जाता येत नसताना वृत्तपत्रे प्रकाशित करण्याची शासनाने परवानगी दिली होती. अशा परिस्थितीत वर्क फ्रॉम होम प्रमाणे काम केले. प्रिटींग प्रेसमध्ये जावून वृत्तपत्र छपाई केली आणि गुरूवारी न चुकता वाचक, जाहिरातदार, खातेदार, वितरकांपर्यंत वृत्तपत्र पोहचविण्यात यश आले. अशा अवघड परिस्थितीत वितरक करणारे सुद्धा जिवाची बाजी लावून वृत्तपत्र प्रत्येक घरोघरी देत होते व वाचकांची भूख भागवित होते.
कुठे थोडी परिस्थिती सुधारत असताना, ओमीक्रॉन सारख्या अदृश्य शत्रूने पुन्हा हल्ला चढविला. मोठ मोठ्या महानगरात रूग्णांची संख्या पाहता, परिस्थिती बिकट तर होणार नाही ना असा प्रश्र्न सतत भेडसावत आहे. मात्र, प्रशासन सज्ज झालेले आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. तरीही न कळत हा छुपा शत्रू कधी मानगुटीवर बसेल याची शाश्वती नाही.
अशा सर्व परिस्थितीमध्ये वृत्तपत्र प्रकाशित करीत राहिलो. वृत्तपत्र सन 2008 पासून सुरू केल्यापासुन वृत्तपत्राची धार आजही तशीच आहे. वृत्तपत्र सुरू केल्यापासून किती चढ-उतार आले, कित्येकांना तोंड द्यावे लागले. तरी सुद्धा निर्भिड लेखनी जशीच्या तशीच सुरू आहे. पत्रकार संपादकांना व वृत्तपत्रात काम करणार्यांना पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला आहे मात्र, तो अजुनही कागदावरच आहे. मध्यंतरी मी खुप मोठा भ्रष्टाचार बाहेर काढला त्याचे वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले. समाजापुढे भ्रष्टाचारांचा बुरखा फाड केला. मात्र, शेवटी संपादकावरच कारवाई करण्यात आली. तरीही खचलो नाही पुन्हा त्याच उमेदीने वृत्तपत्र सुरू ठेवले. मात्र, ज्यावेळी स्वत:वर येते त्यावेळी आपले मागे कोणी नसते हे यामधून शिकायला मिळाले.
पत्रकारांच्या सुख-दु:खात मी रात्र पाहिली नाही, दिवस पाहिला नाही त्यांच्या हक्क व कर्तव्यासाठी भांडत होतो. एक दोघे सोडले तर कोणीही मदतीला आले नाही. तो काळही अडचणीचा होता त्यावेळी एका दिवसात कोरोनाने तीस-तीस व्यक्ती मृत्यूमुखी पडत होते. पै-पाहुणे, नातेवाईक आले नाही तर इतरांचे तर काय घेऊन बसावे हा विचार करीत पुन्हा कामाला लागलो.
कोरोनाने आणखी एक महत्वाची गोष्ट सर्वांना शिकवली ती म्हणजे वाचायला, कोरोना येण्यापुर्वी वाचन संस्कृती रूजली पाहिजे त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले जात होते. मात्र, कोरोना काळात काही वाचकांनी वृत्तपत्रांबरोबर ग्रंथ, नामांकित पुस्तके, कथा, कादंबर्या वाचून काढल्या ही खूप महत्वाची बाब आहे.
येणार्या काळात आणखी दर्जेदार लिखान करून, ज्ञानात भर टाकणार्या बातम्या वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचकांनी काही चुकत असेल तर निसंकोचपणे, मनात काही न आणता प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा फोनद्वारे आपल्या प्रतिक्रीया द्याव्या त्याचा आम्ही स्विकार करू व येणार्या काळात त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू एवढेच या 15 व्या वर्षात पर्दापण केल्याबद्दल आपणास सांगतो.