डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्या पत्रात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याबाबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित नसल्याने महापुरुषांच्या यादीत नाव नाही अशी वाक्यरचना अत्यंत चुकीची आहे. ज्या अधिकार्यांनी ही चुकीची वाक्यरचना लिहिली त्यांनी माफी मागितली पाहिजे.
फाऊंडेशनच्या नियमाप्रमाणे राज्यातून महामानवाच्या यादीत नाव घेण्यासाठी प्रस्ताव यावा लागतो. तो प्रस्ताव फाउंडेशनच्या बैठकीत ठेवून त्यावरती मान्यता घ्यावी लागते. मगच महामानवाच्या यादीमध्ये एखाद्या व्यक्तीचा समावेश होतो अशी फाऊंडेशनची प्रक्रिया आहे.
फाऊंडेशनने पाठवेले पत्र संतापजनक आहे. कारण त्यांनी पत्रात उघडपणे अण्णाभाऊ साठेंची अवहेलना केल्याचे दिसत आहे. कारण त्यांनी अण्णाभाऊ साठे हे प्रसिद्ध नाहीत, त्यामुळे ते महामानव ठरत नाहीत असा उल्लेख केलेले पत्र माजी आमदार सुधाकर भालेराव यांना पाठवले आहे. त्यामुळे आता नवीन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
फाऊंडेशनतर्फे अनुसूचित जातीसाठी कल्याणाच्या योजना राबवल्या जातात. तसेच समाजसुधारक, प्रबोधनकारांची जयंती साजरी करताना केंद्र शासनाच्या डॉ. आंबेडकर फाउंडेशनतर्फे आर्थिक मदत केली जाते. या यादीमध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत रविदास, संत कबीर या महापुरुषांसोबतच राज्यपातळीवरील छत्तीसगढचे संत व सतनामी समाजाचे गुरू बाबा घासीदास, केरळचे पुलियार समाजाचे गुरू संत अय्यंकली, तमिळनाडूचे गुरू नंदनार, महाराष्ट्रातील संत चोखामेळा, संत नामदेव यांचा समावेश आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशन अंतर्गत देशभरातील महापुरुष, समाजसुधारक यांच्या विचारांचा प्रसार व प्रचाराचे काम होते. तसेच राष्ट्रीय आणि राज्यातील समाजसुधारक, प्रबोधनकारांचा फाऊंडेशनच्या यादीत समावेश आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय फाऊंडेशनच्या या उत्तरामुळे संताप व्यक्त होत आहे. मध्यंतरी भाजप आणि आधीच्या शासनाने अशा पद्धतीचा प्रस्ताव न दिल्यामुळे हा अनुचित प्रकार घडला आहे. ही चर्चा होत असताना पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा याबद्दलची चर्चा देखील सुरू झाली आहे.
आण्णाभाऊंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीच्या आधारे समाजात वेळोवेळी घडणारी स्थित्यंतरे, क्षणोक्षणी घडणार्या प्रत्यक्ष घटना आपल्या अशिक्षित आणि अडाणी बांधवांना समजेल अशा त्यांच्या ग्रामीण भाषेत, करमणुकीच्यास्वरूपात समजावून सांगितल्या. त्यावेळी प्रचार माध्यमाची अत्यंत आवश्यकता होती. दलितांची खास अशी वृत्तपत्रे नव्हती. प्रस्थापिते बाबासाहेबांच्या चळवळीला प्रसिद्धी देत नव्हती. त्यावेळी आण्णाभाऊंची खरी प्रतिभा कॉ.पगारे यांनी हेरली आणि आण्णाभाऊंना लिहिते करण्यासाठी कम्युनिस्ट पार्टीने भाडेकरू संघाची एक खोली होती तिथे केली. ती खोली लालबावट्याची खोली म्हणून प्रसिद्ध होती. आण्णाभाऊंनी गण लिहिला पाहिजे अशी सतत मागणी होत होती त्यांनी प्रथम प्रथम मायभूमीच्या चरणा ही गण लिहिली.
आण्णाभाऊंच्या कथा, कादंबर्या, पोवाडे, तमाशे, लावण्या दुर्मिळ हात आहेत. नव्या पिढीला महान लेखक होऊन गेले एवढेच माहिती आहे. आण्णाभाऊंना जो न्याय त्याकाळी साहित्य समीक्षकांनी दिला नाही तो न्याय नवे संशोधक, नवे समीक्षक देतील. एवढे महानकार्य करणार्या साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या नावाची ज्या अधिकार्याने लिखीत अवहेलना केली असेल त्याने माफी मागावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. ज्या अण्णाभाऊंनी कष्टकर्यांसाठी केलेले कार्य त्यांच्यासाठी दिलेला लढा जर केंद्र शासन विसरणार असेल तर याबाबत अण्णाभाऊंचे साहित्य वाचून मोठ-मोठे कलाकार, लेखक, पत्रकार, वक्त्यांना येणार्या काळात मोठे आंदोलन उभारावे लागेल याची नोंद केंद्राने घ्यावी. केंद्राने डोकं फिरल्याप्रमाणे काम करू नये. अन्यथा केंद्राला अण्णाभाऊंच्या कार्याचा हिसका दाखवावा लागेल. उलट केंद्राने आण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी धुळखात पडलेली असताना, उलट प्रसिद्ध व प्रतिष्ठीत नसल्याचे सांगून आणखीन जखमेवर मीठ चोळण्याचे काम केंद्राने केले आहे त्यामुळे केंद्राचं डोकं फिरलं का? असे म्हणावे लागत आहे.