एखाद्या घरात, शेजारी समवयस्कर व्यक्ती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील व्यक्ती मृतदेह एकदा तरी पाहु द्या असे म्हणून उपस्थितांच्या हृदयाला पाझर फोडण्याचे काम करीत असतात. लोकांचा हाच क्षण कोरोना विषाणूने हिरावून घेतला आहे. यामुळे जगण्यातील दु:ख आणखी वाढत आहे. अनके कुटुंबांना आपण उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत आहे. आपल्या जवळची व्यक्ती सोडून गेलीय, हे लोकांना स्वीकारणं सध्याच्या घडीला कठीण झाले आहे. त्यांच्या शेवटच्या क्षणी ना कुणी मित्र-मैत्रिणी सोबत होते, ना नातेवाईक. या विषाणूमुळे नातेवाईक किंवा कुणालाही रुग्णाला भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्यातून विषाणू पसरत नाही, असं आरोग्य संघटना सांगत असेल तरी मृतदेहाच्या कपड्यांवर काही तास विषाणू जिवंत राहू शकतात. त्यामुळे मृतदेहाची तातडीने विल्हेवाट लावली जात आहे.
या कठीण परिस्थितीत रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर, नर्स, कर्मचारी व शेवटची अग्नी देणारे नगरपरिषद व महानगरपालिकेचे कर्मचारी व काही सामाजिक संघटना रुग्णाच्या नातेवाईकांची भूमिका बजावीत आहेत. अंत्यविधी करणारे मृत व्यक्तीचे नातेवाईकाची भूमिका सुद्धा बजावीत आहेत.
जवळच्या व्यक्तीला शेवटचे पाहण्यास मिळत नसेल तर ही खूप मोठी वेदनादायक बाब आहे. एवढी भीषण अवस्था या जागतिक कोरोना विषाणूने करून ठेवलेली आहे. सर्व स्तरातून प्रार्थना केली जात आहे या विषाणूपासुन मुक्ती दे, मात्र, जोपर्यंत या विषाणूवर लस येत नाही तोपर्यंत असा खडतर प्रवास सर्वांना सहन करावा लागणार आहे. लस आलेनंतर मृतदेह एकदा तरी पाहु द्या हा शब्द पुन्हा कोणाच्या तोंडून ऐकावयास मिळणार नाही एवढे मात्र नक्की.