मागासवर्गीय मुलींच्या शासकिय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे(मा.का.): राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात 2021-22 साठी अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, अपंग, अनाथ आदी प्रवर्गाच्या 11वी, पदवी, पदव्युत्तर आणि व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थिनी ही बाहेरगावची परंतू पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारी असावी. मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकार्‍याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलीचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी. कोविड-19 आजाराबाबत वडिलांचे/लाभार्थ्यांचे लेखी संमतीपत्रक असावे. शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्रदेखील अर्जासोबत असणे आवश्यक आहे.

शासकिय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम 900 रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थिनीच्या बचत खात्यावर जमा होते.

कोविड-19 महामारीमुळे रिक्त जागेच्या 50 टक्केच जागा भरल्या जाणार आहेत. गतवर्षी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींचे यावर्षी द्वितीय वर्षांसाठी अर्ज स्वीकारण्यात येतील. बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणार्‍या गरीब होतकरू विद्यार्थिनींनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधिक्षिका पी.व्ही.आंबले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!