अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ब वर्गातून बिनविरोध निवड झाली आहे. या यानिमित्ताने ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये सलग सहाव्यांदा निवडून आले आहेत.या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रावरील आपली पकड अजून मजबूत केली आहे.
दत्तात्रय भरणे हे 1996 पासून सातत्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येत असून त्यांनी 2002 साली पिडीसी बँकेच्या चेअरमनपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. या निवडणुकीमध्ये त्यांनी आपला उमेदवारी अर्ज कृषी व पणन (ब) वर्गातून दाखल केला होता, त्यांच्या विरोधात रावसाहेब विठ्ठल कोकाटे हे रिंगणात होते परंतु कोकाटे यांनी आज स्वतःचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यामुळे दत्तात्रय भरणे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. दत्तात्रय भरणे हे बिनविरोध निवडून आल्याचे समजताच इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला असून ठिकाणी फटाक्यांच्या आतीषबाजीत हा विजय मोठ्या उत्साहात साजरा केला असून राष्ट्रवादीच्या गोटामध्ये आनंदाचे वातावरण आहे.