बारामती(वार्ताहर): खेळाडूंना व्यावसायिक खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि तळागाळातील युवा खेळाडूंना खेळात विकास साधण्यासाठी बारामतीत क्रीडा प्रयोगशाळा उभारणार असल्याचे प्रतिपादन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केले.
बारामतीचे सुपूत्र अभिषेक सतीश ननवरे हा 21 नोव्हेंबर रोजी साऊथ आफ्रिका येथे होणार्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जात आहे. त्यास शुभेच्छा समारंभ कार्यक्रम प्रसंगी श्री.पवार बोलत होते.

या कार्यक्रमास बारामती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे, अस्थिरोगतज्ञ डॉ.हेमंत मगर, डॉ.आदिनाथ खरात, आयर्नमॅन सतीश ननवरे, अभिषेक ननवरे इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे श्री.पवार म्हणाले की, बारामतीत ज्याप्रमाणे खेळाचा विकास झाला त्याप्रमाणे सांस्कृतिक विकास होणे गरजेचे आहे. येणार्या काळात सांस्कृतिक दृष्ट्या खूप काम करावे लागणार आहे. अभिषेक कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी तयार आहे. मनोगत व्यक्त करताना सतिशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. कोणत्याही पालकांना आपला पाल्य श्रेष्ठ झाल्यास अभिमान वाटतो. ननवरे कुटुंब खूप कष्टातून पुढे आलेले आहे. आयर्नमॅन हो, मात्र करइरकडे लक्ष दे असे अभिषेकला सल्लाही त्यांनी दिला. एखादी गोष्ट अति झाली की त्यास आपण व्यसन म्हणतो. या खेळास छंद म्हणून पहा, खेळाबरोबर करइरकडे लक्ष द्या असाही मौलीक सल्लाही त्यांनी यावेळी दिला. अभिषेकला आयर्नमॅनसाठी प्रायोजिकतत्वावर आज काहींनी मदत केली पुढील काळात इतर खेळाडूंना अभिषेकने प्रायोजिक तत्वावर मदत करशील एवढं कर असेही ते म्हणाले.

कृषी महाविद्यालयाच्या आवारात इनक्युबेशन सेंटरची उभारणी केली आहे. यामधून उद्योग व्यवसायाच्या नवीन संकल्पना असलेल्या सर्व वयोगटातील संभाव्य उद्योजकांना घडवण्याचे काम हे सेंटर करणार आहे. जानेवारीपर्यंत अत्याधुनिक असे सायन्स पार्क उभारणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
यावेळी डॉ.खरात यांनी आयर्नमॅनबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. प्रत्येक कार्यात झोकून देणारे सतीश ननवरे असल्याचे सौ.पौर्णिमा तावरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. ते पुढे म्हणाल्या की, व्यक्तीकडे इच्छा, ध्येय व कृती असल्यास तो नक्कीच यश प्राप्त करू शकतो. बारामतीकरांना पवार साहेबांच्या रूपात 80 वर्षाचा योद्धा मिळाला आहे. युवकांना लाजवेल असे काम ते करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक बारामतीकरांना त्यांचा अभिमान आहे. आयर्नमॅन स्पर्धा खूप खर्चिक आहे यास आर्थिक मदत खूप महत्वाची आहे. या स्पर्धेत अभिषेक बारामतीचे नावलौकीक केल्याशिवाय राहणार नाही असेही तावरे यांनी शुभेच्छा देताना सांगितले.

आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार बारामती स्पोर्ट फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सतिश ननवरे म्हणाले की, आयर्नमॅन स्पर्धेसाठी अभिषेकला तयार करताना वडील व प्रशिक्षक ही दुहेरी भूमिका बजावली. आयर्नमॅन होण्यासाठी सातत्य महत्वाचे आहे. मनातून होकार आल्यास कोणीही आयर्नमॅन होऊ शकतो. युवा आयर्नमॅन होण्याचे ध्येय अभिषेकने केले आहे. वडील या नात्याने मुलाचा जो हट्ट असतो तो पूर्ण केला असल्याचेही ननवरे यांनी यावेळी भावनिक होवून सांगितले.
येणार्या काळात बारामतीत स्पर्धेसाठी 400 मीची धावपट्टी व 50 मी.चा जलतरण तलाव व्हावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली ही सुविधा जिल्हास्तरावर पहावयास मिळते. बारामती स्पोर्ट क्लबतर्फे ऑलंपीकमध्ये खेळाडू घडावा हे मोठं स्वप्न पाहिले आहे. 21 नोव्हेंबरला होणार्या स्पर्धा 35 देशात होत असतात. या होणार्या स्पर्धेत 5 ते 6 स्पर्धेत गणल्या जाणार्या स्पर्धेत अभिषेकने निवड केली आहे. कोल्हापूरनंतर बारामती आयर्नमॅनची ओळख व्हावी हा उद्देश आहे. मी तीन वेळा आयर्नमॅन झालो अभिषेकने माझं रेकॉर्ड तोडावे हीच मनोमन इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ज्ञानेश्र्वर जगताप यांनी केले तर शेवटी आभार रविंद्र पांडकर यांनी मानले. याप्रसंगी विविध खेळाडू, प्रशिक्षक, राजकीय, सामाजिक, शासकीय, शैक्षणिक, विधी, आरोग्य, व्यापारी क्षेत्रातील मंडळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.