दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 65 वा गळीत हंगामाचा उपमुखमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

बारामती(उमाका): दि माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव यांचा 65 वा गळीत हंगाम शुभारंभ व औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दतात्रय भरणे, बारामती नगरपरिषेदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे, कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे, व्हाईस चेअरमन बन्सीलाल विलास आटोळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, एकात्मिक विकास पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, प्र. कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, श्री. सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. पवार म्हणाले, यंदा पाऊस खुप प्रमाणात झाल्याने सुदैवाने सर्व धरणे भरली असून शेतकर्‍यांना त्याचा फायदा होईल, शेतीला पाणी कमी पडणार नाही. यंदा ऊसाचे उच्चांकी उत्पादन होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. योग्य ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर करावा. जागतीक बाजारपेठेत साखरेची मागणी वाढत असल्याने आपल्याकडील साखरेला चांगला भाव मिळेल. साखरेची किमान विक्री किंमत वाढवली पाहीजे. कारखान्यात साखरेसाठी चांगल्या प्रकारची गोदामे हवीत. कारखान्यातील कामगार चांगले काम करीत असून त्यांचे नुसकान होणार नाही याची काळजी घ्यावी. सुशिक्षित मुलांना कारखान्यात काम करण्याची संधी द्यावी. सभासदांना चांगला भाव मिळाला पाहिजे. सर्व संचालक मंडळाने सहकार्याने कामे करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब तावरे यांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत माहिती दिली. औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन करुन उपमुख्यमंत्री पवार आणि राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते मोळी पुजन करण्यात आले. यानंतर श्री. पवार आणि भरणे यांच्या हस्ते मोळी गव्हाणामध्ये सोडुन गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!