अपर जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकरांनी केले भरभरून कौतुक
बारामती(वार्ताहर): विधी सेवा दिनापासून सुरू झालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त वकील सदस्यांनी दोन दिवसात बसविलेल्या पथनाट्याच्या रंगीत तालीम सुरू असताना उपस्थित प्रेषकांच्या डोळ्यात अश्रू दिसत होते. या पथनाट्याचे अपर जिल्हा सत्र न्यायाधीश जे.पी.दरेकरांनी भरभरून कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या पथनाट्याच्या रंगीत तालीम पाहण्यासाठी अपर जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश मा.लोखंडे, मा.शेख, मा.बांगडे, मा.शहापुरे, मा.भरणे, मा.देशपांडे, मा.आरबाड, मा.उबाळे, मा.गिरे, मा.आपटे मॅडम, बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड.चंद्रकांत सोकटे व वकील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

या पथनाट्याचे लेखक व प्रमुख सुत्रधार ऍड.धीरज लालबिगे, दिग्दर्शक ऍड.प्रिया गुजर-महाडीक यांनी अथक परिश्रम घेत दोन दिवसात पथनाट्य तयार केले. या पथनाट्यामध्ये ऍड.सोनाली मोरे, ऍड.उषा पोंदकुले-गावडे, ऍड.आरती काकडे, विधी विद्यालयाचे विद्यार्थी पृथ्वीराज टांकसाळे, अभिजीत लोंढे, आर्या सोनटक्के यांनी विविध पात्रे घेत मनाला भावेल अशी भूमिका केली आहे.
या पथनाट्यात बाल लैगिक अत्याचार, महिलांना केंद्रस्थानी मानून महिलांवर होत असलेले अत्याचार, हिंसा, त्यांचे हक्क व कर्तव्य, या विषयक कायदे याबाबत जनजागृती या पथनाट्यातून केली आहे. हे पथनाट्य पाहणार्यांमध्ये महिलांच्या सर्वांगिण विकास व सक्षमीकरणासाठी प्रागतिक दृष्टिकोन रूजवेल व पुरूष प्रधान मानसिकता बदलल्याशिवाय राहणार नाही. सदरचे पथनाट्य गुरूवार दि.14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वा. भिगवण चौक, त्यानंतर इंदापूर चौक व पेन्सील चौक विद्यानगरी एम.आय.डी.सी. याठिकाणी पहावयास मिळणार आहे.

हृदय झाले धस्स…..
सदरचे पथनाट्य सुरू असताना महिलांवर सामुहिक बलात्कार होतो त्याबाबत ऍड.सोनाली मोरे यांनी केलेल्या भूमिकेत किंचाळण्याचा जो आवाज काढला त्यावेळी उपस्थित लोकांचे हृदय धस्स झाले. थोडावेळ परिसरात शांतता झाली. महिलांवर अन्याय व अत्याचार करणार्यांना किंचाळण्याच्या आवाजाने पाझर फूटत नसेल तर ते माणूस म्हणण्याच्या लायकीचे नाही अशा नराधमांना फाशीची शिक्षा सुद्धा कमीच आहे.
वकील सुद्धा लेखक, दिग्दर्शक असू शकतात…
बारामतीत अपर जिल्हा सत्र न्यायालयात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने विधी सेवा दिनानिमित्त सुरू झालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम प्रभावीपणे व बारामती बार असोसिएशनच्या सहकार्याने राबविला जात आहे. जे वकील, फिर्यादी व आरोपींची बाजु न्यायालयात मांडून त्यास न्याय मिळवून देण्यासाठी आपले कसब पणाला लावतात तेच वकिल सुद्धा लेख, दिग्दर्शक व अभिनेता असू शकतात हे दोन दिवसात बसविलेल्या पथनाट्यातून दिसून येत आहे. दिग्दर्शक ऍड.प्रिया गुजर-महाडीक व लेखक व पथनाट्यातील मुख्य सुत्रधार ऍड.धीरज लालबिगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Very nice