बहुजन महापुरुषांच्या आंदोलनांचा उद्देश हा व्यवस्था परिवर्तनाचा होता – ऍड.राहुल मखरे

अशोक घोडके यांजकडून…
इंदापूर(वार्ताहर): बहुजन महापुरुषांच्या आंदोलनांचा उद्देश हा व्यवस्था परिवर्तनाचा होता. तोच उद्देश बामसेफ आणि सहयोगी संघटनांचा असल्याचे मत बामसेफचे राष्ट्रीय महासचिव ऍड.राहुल मखरे यांनी व्यक्त केले.

भवानीनगर, इंदापूर येथील छत्रपती हायस्कूल हॉल मध्ये राष्ट्रीय किसान मोर्चा, बहुजन मुक्ती पार्टी व शेतकरी संघटना यांची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत नेवसे, विशाल निंबाळकर, शेतकरी संघटनेचे हनुमंत वीर, बहुजन मुक्ती पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब भोंग, युवा अध्यक्ष राहुल शिंगाडे, शहराध्यक्ष संतोष क्षीरसागर, छायाताई भोंग, महेश लोंढे व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे मखरे म्हणाले की, अगोदर उद्देश ठरतो आणि त्या उद्देशपुर्ती साठी संघटनेची निर्मीती होते. संघटन बनल्यानंतर उद्देश ठरत नसतो आणि ज्या संघटना बनल्यानंतर उद्देश ठरवतात त्या संघटना आपल्या उद्देशावर ठाम राहत नाहीत. अशा संघटना अंतर्गत कलहामुळे काळाच्या ओघात नष्ट होतात. उद्देश जेवढा मोठा तेवढी संघटनेची व्याप्ती मोठी असायला हवी. उद्देशपुर्ती साठी संघटनेचा वाढ विस्तार करायचा असेल तर संघटनेकडे प्रगल्भ विचारधारा असणे आवश्यक आहे आणि ती विचारधारा बामसेफ कडे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. नवीन कार्यकर्त्यांना संघटनात्मक माहिती देऊन संघटनेचा वाढ विस्तार करण्यास सक्षम बनवण्याच्या हेतूने त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या बैठकीत विविध पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बहुजन मुक्ती पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी नानासाहेब चव्हाण यांनी बोलताना सांगितले की, विचार जगावर राज्य करतो, त्यामुळे कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे भक्त बनू नये तर बहुजन महापुरुषांचे विचार घरा-घरात पोहोचवून त्यांचे अनुयायी बनावे असे मार्गदर्शन करताना मत मांडले.

शेतकर्‍यांना कसे फसवून त्यांची पिळवणूक केली जाते हे अनेक उदाहरणांसह कार्यकर्त्यांना समजावून सांगितले आणि कार्यकर्त्यांनी ही माहिती घेऊन तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत जाऊन त्यांचे प्रबोधन करून त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तयार करावे. अशी अपेक्षा पांडुरंग रायते आणि विशाल निंबाळकर यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले तर सुत्रसंचालन इंदापूर भारत मुुक्ती मोर्चाचे उपाध्यक्ष संतोष कांबळे यांनी केले. राष्ट्रीय किसान मोर्चाचे जिल्हा कोषाध्यक्ष सचिन देशमाने यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!