बारामती(वार्ताहर): बारामती शहर पोलीस स्टेशन आयोजित भव्य महारक्तदान शिबीराचे उद्घाटन पुणे ग्रामीण पोलीसचे पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून व त्यांनी स्वत: रक्तदान करून शिबीरास सुरूवात करण्यात आली.
यावेळी अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे उपस्थितीत होते.

डॉ.देशमुख यांच्या संकल्पनेतून कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना रक्ताची कमतरता भासु नये, पारंपरिक पध्दतीने उत्सव साजरा करून तिसरी लाट येवु नये व त्याचा संसर्ग वाढु नये या सामाजिक बांधिलकीचा दूरदृष्टीकोन ठेवत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे सहकार्य घेवुन आदर्श गणेश उत्सव सन 2021 साजरा करण्यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणेबाबत सुचित करण्यात आलेले होते.
वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून नागरिकांना शिस्त लावण्याचे काम करणार्या पोलिसांनीच एखाद्या स्वयंसेवी संस्थेप्रमाणे मदतीचा हात पुढे करून आयोजित केलेल्या या शिबिराची चर्चा सुरू आहे. एका बाजूला संचारबंदीच्या नियमांची अंमलबजावणी करीत दुसरीकडे रक्तदान शिबिराच्या आयोजनातही पोलिस व्यस्त असल्याचे दिसून आले.
पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. या चौघांनी प्रथम रक्तदान करून शिबीरास प्रारंभ केला.
पो.नि.नामदेव शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत बारामती व परिसरातील विविध सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळे, युवा कार्यकर्ते, महिला मंडळ, व कॉलेजचे युवा युवती तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान केले.
सदर रक्तदानात अक्षय ब्लड बँक, पंढरपुर ब्लड बँक, आशा ब्लड बँकेच्या तज्ञ डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे सहकार्याने भव्य महारक्तदान शिबीर यशस्वी पार पडले. संध्या. 5 वा.57 मि.पर्यंत 750 रक्तदात्यांनी रक्तदान केल्याची माहिती नामदेव शिंदे यांनी दिली.