बारामती(वार्ताहर): वसाहतीच्या लोकांच्या समस्या, अडचणी दूर व्हाव्यात आणि सुख समाधान ऐश्र्वर्य आराम मिळावा या अथक संघर्षातून शेवटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे त्याच जागी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन झाले आणि माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बिरजू भाऊसोा मांढरे यांचे जे स्वप्न होते ते साकार झाले.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील या जागेवर 1971 सालापासून खेळाच्या मैदानाचे आरक्षण होते. आरक्षण काढण्यापासूनचा प्रश्र्न समोर होता. मात्र ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी आरक्षण उठविण्यापासून ते भूमिपूजन होईपर्यंत केलेला खडतर प्रवास शेवटी यशस्वी झाला. ज्या वसाहतीशी लहानपणापासूनचे अतुट असे नाते जुळलेले होते. त्या वसाहतची वाताहात डोळ्यासमोर होणे कदापिही शक्य होणार नाही हे ध्येय उराशी बाळगून नगरसेवक बिरजू मांढरे यांनी तन-मन-धनाने पाठपुरावा व प्रयत्न केला. शेवटी त्या प्रयत्नाला यश आले आणि 96 खोल्यांच्या कुटुंबांची मने जिंकली.
वसाहत पाडल्यापासून काहींच्या मते वसाहत आहे त्याच ठिकाणी उभा राहणार नाही. येथील गोर-गरीबांना घरे मिळणार नाही. तस-तसे बिरजू मांढरे यांच्या हृदयाचा ठोका वाढत होता वेगवेगळे प्रश्र्न मनात घर करीत होते. मात्र, त्यांनी सुद्धा खंबीरपणे वसाहतीतील नागरीकांच्या पाठीशी उभे राहिले. ऊन,वारा व पावसात त्यांच्या मदतीला धावले कारण वडिल भाऊसाहेब मांढरे यांच्यापासून येथील लोकांशी एक वेगळी नाळ जुळली होती. आज भाऊसाहेब असते तर त्यांनी बिरजू यांच्या पाठीवर थाप मारून कौतुक केले असते. 96 कुटुंबियांचे आशिर्वाद ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व बिरजू मांढरे यांना लागल्याशिवाय राहणार नाहीत.
जेव्हा माझा भक्त पडण्याच्या अवस्थेत असतो, तेव्हा मी त्याला मदत करणारा पहिला हात असतो. या साईबाबांच्या वाक्यावरून साईभक्त बिरजू मांढरे यांच्यावर वसाहत पाडल्यापासून जे आरोप-प्रत्यारोप झाले होते ते भूमिपूजनाने परतून लावले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
ना.अजित पवार दिलेला शब्द पाळतात त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा बारामतीकरांना पहावयास मिळाला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहतीतील नागरीकांना सर्व सोयींनी युक्त पक्की व दर्जेदार घरे मिळणार आहेत.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेवक बिरजू मांढरे, मयूरी शिंदे, अनिता जगताप, नीता चव्हाण, सीमा चिंचकर, सविता जाधव, सुधीर पानसरे, नवनाथ बल्लाळ, संजय संघवी, सत्यव्रत काळे यांच्यासह म्हाडाचे शंकर भिसे आदी या वेळी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात 100 घरे बांधली जाणार आहेत. त्यात पुनर्वसन केलेल्या 96 जणांना प्रत्येकी 301 चौरस फुटांचे घर मिळणार आहे. तीन टप्प्यांत सुमारे 276 घरे आंबेडकर वसाहत व साळवेनगर येथे उभारली जाणार आहेत. त्यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
पंतप्रधान आवास योजना, महाहौसिंगकडून मदत मिळणार आहे. प्रत्येक घरासाठी केंद्राकडून दीड लाख, राज्याकडून एक लाख, कामगार कल्याण विभागाकडून एक लाख, तर माता रमाई मागासवर्गीय निवारा योजनेतून एक लाख रुपये प्रत्येक घरासाठी मिळणार आहेत. 1 लाख 83 हजार रुपये नगरपालिकेकडून देण्यात येणार आहेत, अशी माहिती या वेळी गुजर यांनी दिली. कामाचा दर्जा चांगला राखला जावा, लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नागरिकांना आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे पक्की घरे द्यावीत, अशी सूचना पवार यांनी या वेळी केली.