बारामती(वार्ताहर): रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंधेला बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व त्यांच्या टीमने एका महिलेची रक्षा करून प्रत्यक्षात रक्षाबंधन सणाचे महत्व समाजासमोर ठेवले आहे.
कोरोना व लॉकडाऊन काळात हाताचे काम गेले त्यामुळे एका महिलेने मेसचे डबे देण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी तिने ठिकठिकाणी कागदी फलक लावले होते. सदरचा फलक एका लिंगपिसाट व्यक्ती पाहुन सदर महिलेला फोन केला व म्हणाला माझ्याकडे अठरा कामगार आहेत त्यांना डबे देताला का? हाताला काम मिळणार म्हणून महिला सतत या व्यक्तीशी संपर्क करीत होती. दोन पैसे महिन्याला मिळतील या आशेवर सतत पोटतिडकीने फोन करीत होती. या लिंगपिसाट व्यक्तीने थेट या महिलेला अश्लील भाषा करून तुम्हाला डबे देतो पण तुम्ही शारीरिक संबंध ठेवले पाहिजे. या फोनने या महिलेचे चारित्र्यावर शिंतोडे उडाले, त्या महिलेला रात्रभर झोप नव्हती दुसर्या दिवशी या महिलेने न भीता शहर पोलीस स्टेशनला धाव घेतली. ठाणेअंमलदार सेवा बजाविणारे पोलीस हवालदार ए.व्ही.सातपुते यांनी तातडीने या महिलेची दखल घेत सदरचा फोन नंबरचा तपास पो.कॉ.डी.एल. इंगुले यांना करण्यास सांगितले. यांनी तर फोन नंबरचा तपास लागताच सदर इसमास पोलीस स्टेशनला बोलाविले व चांगला चोप दिला. या महिलेने सुद्धा स्वत:चा राग व्यक्त केला व तिनेही चोप दिला. यामुळे या महिलेच्या अंगी जी भिती निर्माण झाली होती ती तिने त्या व्यक्तीस मारल्याने भिती दूर झाली. एवढी तत्पर सेवा मिळाल्याने या महिलेने पोलीसांचे किती आभार मानावे हे कळत नव्हते.
रक्षाबंधनाच्या पुर्व संधेला ज्याप्रमाणे एक भाऊ संकटात सापडलेल्या आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी आहे त्या स्थितीत येतो त्याप्रमाणे पोलीसांनी तत्परता दाखविली व या महिलेवर झालेला व पुढील होणार्या अन्यायापासून मुक्त केले.
पो.ह.सातपुते व पो.कॉ. इंगुले यांना एवढ्या तत्परतेने केलेल्या कामाबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले वरिष्ठ अधिकारी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे हेच तत्पर आहेत त्यामुळे काम करताना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभते.