वतन की लकीर (ऑनलाईन): आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 10 जुलै ते 15 ऑगस्ट 2021 या दरम्यान राज्यस्तरीय ऑनलाईन ’सृजन भजन स्पर्धा-2021’ आयोजन करण्यात आले होती. या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी बारामती येथे करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी भजन गायकांना आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय समृद्ध परंपरेला सृजनच्या माध्यमातून भव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले. संपूर्ण राज्यातील समस्त इच्छुक नागरिकांना, भजन गायक भजनी मंडळांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले होते, त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
राज्यातील एकूण 36 जिल्ह्यातून, 197 तालुक्यांतून 1220 संघ तसेच 14512 स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सृजन आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन ’सृजन भजन स्पर्धा-2021’ मध्ये सहभागी स्पर्धकांकडून भजन स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यादिनी आमदार रोहित पवार स्वतः उपस्थित राहणार असून, ते महाराष्ट्राच्या ऐतिहासिक किल्ल्यांमधील अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ल्याच्या बाबत महत्वपूर्ण घोषणा देखील करणार आहेत.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदायाच्या महान आध्यात्मिक परंपरेतून लोकांना भक्तिमार्गाची मिळालेली शिकवण समृद्ध समाजाच्या जडणघडणीचा पाया आहे. कोविडच्या महामारी काळात सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र या संकटकाळात विठ्ठल भक्तीची सर्वांना अनुभूती घेता यावी तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला अध्यात्माची आवड जोपासता यावी म्हणून या सृजन भजन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.