बारामती(वार्ताहर): सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी खोर्यात अतिवृष्टीने थैमान घातल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठया प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांची हलाकीची परिस्थिती झाली आहे. अतिवृष्टीचा भाग दुर्गम असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहेत अशा संकटाच्या काळात मानवतेच्या भावनेतून संत निरंकारी मिशन सातारा झोन च्या वतीने कांदाटी खोर्यातील 11 गावांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य, किराणा साहित्य, औषधे-गोळ्या, चप्पल, कपडे इ. वाटप करण्यात आले.
या उपक्रमात संत निरंकारी मंडळाच्या बारामती क्षेत्रातील 50 ते 60 सेवादलांनी सहभाग घेतला. यामध्ये इलेक्ट्रीशन, प्लबर, फिटर, वेल्डर व पशुवैद्यकीय डॉक्टर यांचा समावेश होता.
तसेच नुकसानीचे दुरुस्ती बाबत काही ठिकाणी प्रयत्न करणेत आला. तत्पूर्वी सकाळच्या सत्रामध्ये जावळी तालुक्यातील वाहिटे गावामध्ये ही 27 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू चे किट देण्यात आले.
सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या आशीर्वादाने, सातारा झोनचे झोनल इंचार्ज नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व बारामती क्षेत्राचे सेवादल क्षेत्रिय संचालक किशोर माने यांच्या नेतृत्वाखाली मदतीचे कार्य पार पडले.
निसर्गाने निर्माण केलेल्या अतिवृष्टीमुळे कंदाटी खोर्यातील 16 गावांचा संपर्क तुटला होता. जनसंपर्क नसलेल्या या भागाची व्यथा एका स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर तातडीने येथील स्थानिक नागरिक संतोष पवार (रा.पावशेवाडी) यांच्या सहकार्याने मदतीचे प्रारूप आखण्यात आले. केवळ तीनच दिवसाचे आत संत निरंकारी मिशनवर श्रद्धा असणार्या अनेक अनुयायांनी उदार अंतकरणाने मदत देऊ केली.
प्राप्त मदत बाधितांना पोहचविणे हीच खरी आव्हानात्मक बाब होती. कारण रस्तेवाहतुक नसलेने जलवाहतुकीतूनच प्रत्यक्ष बाधितांना मदत पोहचविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कोयना धरणाचा पाणी फुगवटा, वेगाने वाहणारे वारे, धुवाधार पाऊस यामुळे जीवावर उदार होऊन मदतकार्य करत कंदाटी खोर्यातील शिंदी, आरव ,नवी मोरणी, मोरणी, म्हाळुगे, लामज, उचाट, सुतारवाडी, सालोशी, बन, दोडानी या गावातील प्रत्येक कुटुंबाला अत्यावश्यक मदत पोहोच करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मदतीचे कार्य सुरू होते.
तसेच रविवारी देखील माचतुर, एरंडेल, धारदेव, माचूतरवाडी या ठिकाणीही 270 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू चे किट देण्यात आले आहे. असे एकूण 700 कुटुंबाना किट वाटण्यात आले असून सर्व गावातील नागरिकांनी तातडीच्या मदतीबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी भावना व्यक्त करताना क्षेत्रिय संचालक किशोर माने म्हणाले, नर पूजा हीच ईश्वर पूजा या संत निरंकारी मिशनच्या ब्रीद वाक्यास अनुसरून व सद्गुरू माता सुदीक्षा महाराज यांच्या आशीर्वादाने, सातारा झोनचे झोनल इंचार्ज नंदकुमार झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज कंदाटी खोर्यामध्ये सेवा करण्याची संधी प्राप्त झाली.
आजची भौगोलिक परिस्थिती पाहता, येथिल बधितांना मदतीची गरज होती. माणुसकीची भावना जोपर्यंत मनात रुजत नाही तोपर्यंत खर्या अर्थाने आपलेपणा निर्माण होत नाही. ह्याच आपुलकीच्या भावनेतून मिशनच्या माध्यमातून यापुढेही सर्वोतोपरी मदतीसाठी कार्यरत राहू. यावेळी महाबळेश्वर पंचायत समिती चे सभापती संजय गायकवाड यांनीही या कार्याचे कौतुक केले.
सेवादल विभागाचे सतीश गावडे, डॉ नरुटे प्रदीप परदेशी, संदीप आवारे, महेश बांडे, डॉ सोलनकर, आबा पवार, गणेश शिंदे, प्रकाश दरदरे, यासह 50 सेवादल उपस्थित होते.