बारामती(वार्ताहर): येथील विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने करण्यात आलेले उपोषण चौथ्या दिवशी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या प्रयत्नातून मागे घेण्यात आले.
दि.5 ऑगस्ट पासून बारामती बस स्थानकासमोर प्रशांत विष्णू सोनवणे, तुषार विजय गायकवाड यांनी उपोषण सुरू केले होते. दि.8 ऑगस्ट रोजी रिपब्लिकन सेनेच्या मागण्या वरिष्ठांकडे वर्ग करण्यात आल्या असल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर सदरील उपोषण मागे घेण्यात आले.
बस स्थानकास विश्र्वरत्न प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याबाब व बस स्थानकाची जागा ही महार वतनाची असून, ज्या लोकांची जागा बस स्थानकबांधण्यासाठी घेण्यात आल्या त्यांच्या वारसांना कायम स्वरूपी एस.टी.महामंडळात नोकरी देण्याबाबत तसेच नवीन एस.टी. बस स्थानकामध्ये व्यवसायासाठी गाळे देणेबाबतच्या मागण्या करण्यात आल्या होत्या. बसस्थानकास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाव देणेबाबत प्रशांत सोनवणे यांची गेली 15 वर्षापासुनची मागणी आहे मात्र आजपर्यंत त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
उपोषण सोडतेवेळी रिपब्लिकन सेनेचे पश्र्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल साळवे, जिल्हाध्यक्ष आनंद बगाडे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, आगार प्रमुख श्री.गोंजारी, उपाध्यक्ष अनुप विजय सोनवणे, तैनुर शेख इ. मान्यवर उपस्थित होते.