मुंबई: राज्यात कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव आहे. हा विषाणू हवेच्या माध्यमातुन पसरणारा विषाण आहे. या विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तिने सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे इतर व्यक्तिही प्रभावित होऊ शकतात व प्रसार वाढु शकतो. त्याचप्रमाणे क्षयरोग व यांसारखे अन्य आजारांची लागण इतरत्र थुंकल्यामुळे होऊ शकते.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे व त्यांना शिक्षणासाठी निरोगी वातावरण पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे शाळा परिसरात थुंकल्यामुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्ग विद्यार्थ्यांना होऊ नये व विद्यार्थ्यांना कोविड व त्यासारख्या इतर रोगांच लागण होऊ नये या करिता सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याच बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने खालील मार्गदर्शक सूचनांची सर्व शाळांनी अंमलबजावणी करावी असे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अवर सचिव संतोष गायकवाड यांनी प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार कळविले आहे.
मार्गदर्शक सूचना :
1) सर्व शैक्षणिक संस्थांच्या ( शैक्षणिक संस्था हे सार्वजनिक ठिकाणी असल्यामुळे ) परिसरात थुकण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.
2) शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची मुल्ये अंगी रूजण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी सामाईक प्राथनेअंती तसेच शालेय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेल्या सार्वजनिक स्वच्छता वैयक्तिक स्वच्छता या विषयांचे महत्त्व पटवून द्यावे.
3) कोविड-19 प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन कालावधीत ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर वर्ग सुरू होण्यापूर्वी थुंकल्याने होणारे आजाराविषयी माहिती द्यावी व स्वच्छतेची मुल्ये अंगीकारण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
4) शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याने निर्माण होणारे आरोग्यविषयक संसर्गा विषयी स्थानिक आरोग्य कर्मचारी यांच्या सहकार्याने मार्गदर्शन करावे व त्यांना यापासून परावृत्त करावे, त्यांना स्वत: च्या आरोग्याचे रक्षण करण्याकरिता मार्गदर्शन करावे.
5) शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. शिक्षकांकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती 200 रूपये असा दंड वसूल करण्यात येईल. असे वारंवार घडल्यास कमाल 1200 रू. पर्यत दंड देय राहील.
6) विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे हे विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत सामान्य नागरिकांची ही जबाबदारी आहे. अशा व्यक्तीकडून या सूचनांचे उल्लंघन झाल्यास प्रतिव्यक्ती 200 रूपये असा दंड वसूल करण्यात येईल. असे वारंवार घडल्यास कमाल रू. 1200 पर्यत दंड देय.
7) सदर प्रकरणी दंड वसूल करण्याचा अधिकार हा संबंधित शैक्षणिक संस्थेतील प्रमुख म्हणजेच मुख्याध्यापक/प्राचार्य यांना राहील.
8) या मार्गदर्शक सूचनांच्या नियमित देखरेखीसाठी संबंधित शैक्षणिक संस्थेचे प्रमुख किंवा शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखांनी प्राधिकृत केलेले शिक्षक यांची असेल.
आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून सर्व शैक्षणिक संस्थामध्ये थुंकणे विरोधी मार्गदर्शक सूचना निर्गमित करणेबाबत आवश्यक त्या सुचना संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात याव्यात.