दुकाने उघडी ठेवण्याबाबत व्यापारी ठाम दि.9 ऑगस्टला होणार पालकमंत्र्यांच्या बैठकीत निर्णय

पुणे : करोना र्निबधांनुसार दुपारी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश असले तरीही शहरातील व्यापारी सायंकाळपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यासंदर्भात ठाम आहेत. त्यामुळे दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवून व्यापार्‍यांनी एकजूट दाखवून दिली. दि.9 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत निर्णय होणार आहे. दुकाने चारनंतर उघडी ठेवण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला असल्याचे पुणे व्यापार महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी कळविले आहे.

पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया यांच्यासह पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. त्यावेळी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणार्‍या बैठकीत व्यापार्‍यांची मागणी ठेवण्यात येईल, असे महापौर आणि पोलिस आयुक्तांनी सांगितले.

राज्यातील जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले असून तेथे दुकानांची वेळ वाढवून देण्यात आली आहे. मात्र, करोनाबाधितांची संख्या कमी असतानाही प्रशासनाने पुण्यातील दुकानांना वेळ वाढवून न दिल्याने व्यापार्‍यांनी बुधवारपासून शहरातील सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सलग दुसर्‍या दिवशी व्यापार्‍यांनी दुपारी चारनंतर दुकाने उघडी ठेवली होती.

करोना निर्बंधानुसार दुकाने चार वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश प्रसृत करण्यात आले आहेत. पुणेकरांना निर्बधांतून दोन दिवसांत दिलासा मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. पण, प्रत्यक्षात पुण्यातील निर्बध कायम ठेवण्यात आल्यामुळे व्यापार्‍यांची सहनशीलता संपली. पुणेकरांची स्वाक्षरी मोहीम, दुकानांसमोर घंटानाद आंदोलन करून व्यापार्‍यांनी शासनाचे लक्ष वेधले. खटले भरले तरी चालेल, पण बुधवारपासून चारनंतर दुकाने उघडी ठेवू असा आक्रमक पवित्रा व्यापार्‍यांनी घेतला. त्यानुसार बुधवारी लक्ष्मी रस्त्यावरील व्यापार्‍यांकडून दुकाने उघडी ठेवण्यात आली होती. व्यापारी महासंघाच्या आवाहनानुसार गुरुवारी दुपारी चारनंतर शहराच्या विविध भागात व्यापार्‍यांनी दुकाने सुरू ठेवली. मात्र, पोलिसांचे पथक, अधिकारी फिरत असल्याने तासाभरात दुकाने बंद करण्यात आली.

पालकमंत्री अजित पवार यांच्याबरोबर शनिवारी होणार्‍या बैठकीत चर्चेचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करून सोमवारनंतर परिस्थितीनुसार पुन्हा सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येतील, असे महेंद्र पितळिया यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!