बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या सुचनेनुसार गुरुवार दि.1 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन कसबा-बारामती या ठिकाणी छोट्या मोठ्या स्थानिक अडचणी सोडविण्यात येणार असल्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले आहे.
यावेळी पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सचिव संस्था, सोमेश्वर, माळेगाव, भवानीनगर कारखाना, संजय गांधी, विद्युत वितरण व पुरवठा कमिटीसह पक्ष प्रतिनिधी व सर्व संस्थांचे प्रमुख मान्यवर आपल्या तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी शासन दरबारी सोडविण्यासाठी तसेच विकासकामे, सहकारी संस्था व कामकाज अडचणी व मदतीसाठी उपस्थित राहणार असून दर आठवड्याच्या गुरुवारी हा उपक्रम नियमितपणे चालू राहणार आहे.
तरी सर्व कार्यकर्ते यांनी या उपक्रमात सहकार्य करून जनतेच्या सार्वजनिक, वैयक्तिक, गाव विकासाच्या व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी मदत करावी असेही आवाहन श्री.होळकर यांनी केले आहे.
कित्येक वेळा तक्रार कुठे करायची, कशी करायची त्याची दखल कोण घेणार याबाबत तक्रारदार अज्ञानी असतो. कित्येक वेळा घरच्या नळाला पाणी येत नसते, तक्रार मात्र देशाच्या राष्ट्रपतीला केल्यास तो प्रश्र्न मार्गी लागेल का? हा खरा प्रश्र्न आहे.त्यामुळे वरील शासकीय निमशासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहुन संबंधित नागरीकांचा नेमका प्रश्र्न ऐकून यातून मार्ग काढणार आहेत.