बारामती(वार्ताहर): राज्य शासनाच्या तालुकास्तरावरील उच्च समिती मानल्या जाणार्या एकात्मिक विकासासाठी समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या बारामती तालुका अध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड करण्यात आली.
होळकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडीत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्षा सौ.वनिता बनकर व शहर अध्यक्षा सौ.अनिता गायकवाड यांना सुद्धा या समितीत स्थान मिळाल्याने सर्वत्र यांचे अभिनंदन होत आहे.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्या निर्णयानुसार ही समिती गठित केली. या समितीत होळकर यांच्यासह बाळासाहेब शंकरराव परकाळे (अंजनगाव), सुशांत महादेव जगताप (सुपे), मंगेश दत्तात्रय खताळ (तरडोली), निखिल चांगदेव देवकाते (मेखळी), रमेश शंकरराव इंगुले (बारामती), वनिता रवींद्र बनकर, अनिता सुरेश गायकवाड (बारामती) यांचाही समावेश आहे.
राज्य विधानपरिषदेचे सदस्य या समितीचे सदस्य असतात. याशिवाय तहसील विभागातील खरेदी-विक्री संस्थेचे अध्यक्ष सदस्य म्हणून काम पाहतात. तहसीलदारांकडे सदस्य सचिव ही जबाबदारी असते.
ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण आणि व्यापक विकास लक्षात घेत ही समिती गठित केली जाते. अध्यक्षपदी कोणाची निवड करायची, याचे सर्वाधिकार जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना असतात. बारामतीचे आमदार व जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार हे आहेत. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी संभाजी होळकर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.