बारामती(वार्ताहर): दुसर्याच्या आरक्षणाच्या दुखण्यावर फुंकर मारण्यासाठी आमच्या पदोन्नती आरक्षणाचा बळी दिला जातोय की काय? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र सोनवणे यांनी लेखी निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
शेकडो वर्षापासून दबलेल्या पिछाडलेल्या मागासलेल्या समाजास भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित संविधानामुळे स्वाभिमानाचे जगणे प्राप्त झाले. डॉ.बाबासाहेबांचे विचार आत्मसाद करून आमचा समाज हा शिक्षण घेऊन काही प्रमाणात नोकरभरती होऊ लागला आणि पदोन्नती आरक्षणाचा लाभ घेता येऊ लागला. त्यामुळे मागासवर्गीय समाजातील लोकांच्या चेहर्यावर एक प्रकारचे समाधान दिसू लागले परंतु हेच समाधान महाविकास आघाडी सरकारला बघवले नाही का? असेही त्यांनी म्हटले आहे.
पदोन्नती आरक्षणाचा विषय हा माननीय सुप्रीम कोर्टा मध्ये सुनावणीसाठी प्रलंबित असताना देखील महाविकास आघाडी सरकारने दि.7 मे 2021 रोजी पदोन्नती आरक्षण रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा दुर्दैवीच आहे म्हणावा लागेल. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेला हा दुर्दैवी निर्णय तत्काळ रद्द करावा आणि आपल्या आधिकारांचा उपयोग करून पदोन्नती आरक्षण हे बिंदू नामवली प्रमाणे राबवावे.
अन्यथा आपल्या या पदोन्नती आरक्षण विरोधी धोरणाविरोधात आरपीआय (आठवले) मार्फत रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असेही लेखी निवेदनात म्हटले आहे. याबाबतचे लेखी निवेदन दि.7 जून 2021 रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांना प्रशासनाच्या माध्यमातून देण्यात आले. निवेदन देते समयी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे पुणे जिल्हा युवक सरचिटणीस रविंद्र(पप्पू)सोनवणे, शहराध्यक्ष अभिजित कांबळे, शहर सचिव सम्राट गायकवाड, सुनिल शिंदे, पुणे जिल्हा महिला कार्याध्यक्षा रत्नप्रभा साबळे व रोजगार समितीचे तालुकाध्यक्ष माऊली कांबळे इ. बारामती शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.