बारामती(प्रतिनिधी): 40 वर्षापासून पवार कुटुंबाबरोबर विश्र्वास, स्नेह व आधाराचे नाते असणारे किरणदादा गुजर असल्याचे प्रतिपादन बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा तावरे यांनी केले.
हिंदू-कोल्हाटी समाज, काळे परिवार व नगरसेवक सत्यव्रत अर्जुनराव काळे यांच्या वतीने किरण गुजर यांची विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेवर विश्र्वस्तपदी निवड झालेबद्दल त्यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम प्रसंगी सौ.तावरे बोलत होत होत्या.
यावेळी नगरीच्या प्रथम नागरीक सौ.पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा सौ.तरन्नुम सय्यद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण, किरण तावरे, सिद्धनाथ भोकरे, नवनाथ बल्लाळ, अल्ताफ सय्यद, नगरसेवक बबलू देशमुख, सुरज सातव, बाळासाहेब जाधव, बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, सुधीर पानसरे, संतोष जगताप, अभिजीत चव्हाण, सौ.शारदा मोकाशी, सौ.अनिता जगताप, सौ.निलिमा मलगुंडे, सौ.सुरेखा चौधर, सौ.रूपाली गायकवाड इ. मान्यवर उपस्थित होते.
पुढे सौ.तावरे म्हणाल्या की, किरणदादांची विश्र्वस्तपदी निवड झालेवर सर्वांना आनंद झाला तर काहींना नाराजीचा असावा. अशा अष्टपैलू व्यक्तीमत्वाला पवार कुटुंबियांनी संधी दिली याचे कौतुक वाटते. समाजात दुसर्याचे कौतुक करण्याचे कमी झाले मात्र, नगरसेवक सोनु काळे यांनी त्यांच्यावर झालेले संस्कारातून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.25 वर्षापूर्वीची बारामती व आताची बारामती यामध्ये खुप बदल झालेला आहे. आपण बारामतीला विकासाचा पॅटर्न असे म्हणतो. बारामतीचा विकास म्हटलं की पवार कुटुंब जसे आठवतात त्याप्रमाणे मला स्वत:ला वैयक्तिक किरणदादा आठवतात. यांचेसारखे काम करणे म्हणजे सोपं नाही. यामागील भूमिका खुप कठोर व कटू आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी जाणून घेतल्या पाहिजे. प्रत्येकाचा वाईटपणा किरणदादा घेत आले आहेत.
बारामतीसाठी किती चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. ते माझ्यासाठी पितृतुल्य सारखे आहेत. नगरपालिकेत प्रत्येक महिला दादांकडे विश्र्वासाने जातात. ज्याप्रमाणे नेतृत्वाने विश्र्वास दिला आहे. त्याप्रमाणे त्या महिलांना समजून घेणे महत्वाचे आहे. तिथं काही त्रास झाला तर त्यांच्यासाठी किरणदादा आहेत हा विश्र्वास सर्वांना आहे.
13 व्या वर्षी वडिलांचे छत्र हरपले, कोणताही सामाजिक, राजकीय वारसा नसताना त्यांनी आईच्या आशिवार्दावर त्यांनी सगळ्यांची मने जिंकली आहेत. सध्याच्या पिढीला त्यांचा आदर्श घेणे महत्वाचे आहे. निवडणूकीत रात्रं-दिवस जबाबदारीचे काम वाखण्याजोगे आहे. त्यांना खोटं खपत नाही, ते चुकीच्या गोष्टींना कधीही साथ देत नाही. अन्यथा आहे तेथून जाण्याची तयारी असते. मी त्यांच्या कामातून पाहिले आहे. किरणदादांची भूमिका किती महत्वाची आहे. ते फक्त पवार कुटुंबियांसाठी काम करतात. हे काम करीत असताना खूप गोष्टींचा व व्यक्तींचा त्रास होत असतो. त्यांच्या वैयक्तिमत्वाचे पैलू खूप आहेत. राजकीय, सामाजिक बरोबर शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटविला आहे. जिथं जातात त्याठिकाणी त्याप्रमाणे वागतात, निरपेक्षपणे काम करीत असतात. अजितदादांना सांगण्याची पद्धत त्यांनी वेगळीच आहे. चांगल्या कामासाठी नटराज त्यांची टीम धावत असते. कोविडमध्ये खूप मोठे त्यांनी काम केले आहे.
यावेळी किरण तावरे, राजेंद्र बनकर, राजेंद्र ढवाण, शुभम अहिवळे, सौ.तरन्नुम सय्यद इ. मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत काळे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलीम सय्यद यांनी केले तर शेवटी आभार नगरसेवक सत्यव्रत काळे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य काळे कुटुंबिय व मित्र परिवार उपस्थित होता. शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
किरणदादांचे मनोगत….
गेल्या 40 वर्षापासून मी पवार कुटुंबियांबरोबर आहे. आजपर्यंत मी पवारांचा विश्र्वास कमविला आहे. पवार कुटुंबियांच्या नामांकित संस्थेवर विश्र्वस्तपदी निवड होणे म्हणजे माझे खुप मोठे भाग्य व जबाबदारी आहे. पवार कुटुंबिय निवडणूकीत कोर्या स्टॅम्प पेपरवर सह्या करून माझ्याकडे देत असतील तर यापेक्षा मोठा विश्र्वास मला मिळालेला आहे. सन 1986 पासुन पवार साहेबांबरोबर काम करीत असताना, विविध केंद्रीय, राज्य कमिट्यांवर माझी निवड केली. चांगले काम करीत असताना आरोप होतात, लोकांनी परमेश्र्वराला सुद्धा नावे ठेवलेली आहेत त्यामुळे माझी तुलना होऊ शकत नाही. मी आजपर्यंत कोणाचे वाईट केले नाही. पटलं नाही तर निघून जातो पण तत्वाशी तडजोड करीत नाही. आजही नेतृत्वासाठी वाईटपणा घेण्यास तयार आहे. फक्त अजितदादांसाठी काम करीत आहे त्यांच्या शब्दाव्यतिरिक्त काहीच करत नाही. काळे कुटुंबियातील भिमराव, रामभाऊ यांच्याबरोबर काम केले आहे. ऋतुराज काळे यांनी मोठ्या भावाप्रमाणे प्रेम केले त्याची निष्ठा किती आहे हे मला माहिती आहे. एक चांगला नगरसेवक सत्यव्रत आपल्यात आहे. मी तिसर्या पिढीबरोबर काम करीत आहे. या पिढीने शिकण्यासाठी माझ्याकडे हट्ट केला पाहिजे. ज्याप्रमाणे मी कोणताही कार्यक्रम असो तो नेटका केल्याशिवाय शांत बसत नाही त्याचप्रमाणे सत्यव्रतने सुद्धा आजचा नेटका कार्यक्रम करून दाखविला आहे. एक किरण गुजर होण्याचा प्रयत्न करा, आपण सर्व पवारांसाठी काम करीत राहु या. त्यांच्या दरबारी न्याय आहे. सर्वसामान्यांचा प्रतिनिधी विद्या प्रतिष्ठानवर गेला आहे त्यामुळे संवादाचे अंतर कमी झाले असल्याचे मित्र मंडळींकडून बोलले जात आहे.