बारामती(वार्ताहर): खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात बारामती येथे ऍट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा याकरीता पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सी.आर. सामाजिक संघटनेचे उपाध्यक्ष चेतन कुचेकर यांनी अर्ज दाखल केला आहे.
12 डिसेंबर रोजी मध्यप्रदेश मधील सीहोरमध्ये आयोजित एका क्षेत्रिय संमेलनात ठाकूर यांनी चातुर्वण्य व्यवस्थेचे समर्थन केले होते. त्या म्हणाल्या की, आपल्या धर्मात समाज व्यवस्थेसाठी चार वर्ग निश्र्चित केले आहेत. क्षत्रियांना क्षत्रिय म्हटल्यास वाईट वाटत नाही. ब्राह्मणांना ब्राह्मण म्हणल्यास वाईट वाटत नाही. वैश्यांना वैश्य म्हटल्यास वाईट वाटत नाही. शुद्राला शूद्र म्हटलं की लगेच वाईट वाटते. कारण काय तर समज नसणे, त्यांना समजतच नाही. सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे त्यांचे कृत्य दलीत समाजाचा अपमान करणारे आहे. जातीयवादाला व जातीयवाद वाढवणार्या चातुर्वर्ण्य वैवस्थेला समर्थन देणारे आहे. दलीत समाजाला कमी लेखणारे आहे व जाहीरपणे जातीयवाद करणारे व जातीय तेढ निर्माण करणारे व राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करणारे आहे. हे कृत्य ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत व इंडियन पिनल कोड व इतर कायद्यानुसार खूप मोठा गुन्हा आहे. साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर ह्या खासदार आहेत व त्यांचे अनुकरण व समर्थन करणारे अनेक लोक आहेत त्यांनी जर अशा प्रकारचे वक्तव्य केले तर याचा वाईट परिणाम निश्चितपणे समाज व्यवस्थेवर होऊ शकतो.
साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांचा अशा प्रकारचे वक्तव्य असणारा व्हिडिओ कुचेकर यांनी दिनांक 19 डिसेंबर रोजी अछख या वृत्तसंस्थेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वर पाहिला आहे. या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ व बातमी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर दिनांक 13 डिसेंबर 2020 रोजी रात्री 3:13 मिनिटांनी अपलोड केलेला होता. त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात योग्य त्या कायद्यांनुसार व कलमानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी कुचेकर यांनी केलेली आहे.