अजितदादांच्या बैठकीनंतर सानुग्रह अनुदानाच्या आंदोलनावर पडला पडदा: कर्मचार्‍यांची कोणी केली दिशाभूल?

बारामती(वार्ताहर): राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी नगरपरिषद कर्मचार्‍यांना सानुग्रह अनुदानाबाबत घेतलेल्या बैठकीनंतर कर्मचार्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर पडदा पडला. मात्र, कर्मचार्‍यांची कोणी दिशाभूल केली. मध्य न काढता, नगरपरिषदेची वस्तुस्थिती न मांडता आंदोलन करण्यास कोणी भाग पाडले याबाबत चर्चेचा विषय बनला आहे.

दरवर्षी सानुग्रह अनुदान कर्मचार्‍यांना दिले जाते. यावर्षी संपूर्ण देशात व राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे यामुळे सगळ्यांची आर्थिक स्थितीला धक्का पोहचलेला आहे. यामुळे नगरपरिषदेची वसुली झाली नाही. तोटा सहन करावा लागला यामुळे सानुग्रह अनुदान देण्यात आले नाही. बारामती नगरपरिषदेत एक हाती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सत्ता असताना एक विचार, एक निर्णय व एक दिशा अपेक्षित असताना कर्मचार्‍यांना अनुदानासाठी आंदोलन करावे लागत असेल तर खुप मोठी शोकांतिका आहे.

कर्मचार्‍यांचीही दिशाभूल…?
नगरपरिषदेच्या वैभवात भर घालणारे खरे कर्मचारी आहेत. हा नगरपरिषदेचा आत्मा आहे. गटा-तटाचे राजकारण पुढे करून आम्ही तुमचे किती काळजीवाहू आहोत व दुसरे किती कपटी आहेत हे दाखविण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आला. यापुर्वी सुद्धा नगरपरिषदेत वेगवेगळे सदस्य होऊन गेले मात्र, या टर्ममध्ये आंदोलन कर्त्यांना सहकार्य करणारे काही नगरसेवक दिसले असे का?
या नगरसेवकांनी आंदोलनकर्त्यांना वस्तुस्थिती काय आहे, तुम्ही करीत असलेल्या आंदोलनामुळे नेत्यांच्या नावाला व बारामतीच्या नावाला काळीमा फासली जाईल याचा काही एक विचार न करता कर्मचार्‍यांचा अंत कोणी पाहिला. वेगवेगळ्या कल्पना, युक्त्या कर्मचार्‍यांना करण्यास भाग कोणी पाडले. या सर्व प्रकारामुळे काही नगरसेवकांचा कारभार पाहणार्‍या नगरसेवकाला लक्ष करून नेत्यांना व बारामतीला बदनाम करण्याचा डाव उघड झाला.

काही नगरसेवकांच्या म्हणण्यानुसार एकच माणुस नगरपालिका चालवितो व त्याच्यामुळे अनुदान मिळाले नाही असा प्रसार व प्रचार कर्मचार्‍यात करण्यात आला व तो बिंबविण्यात सुद्धा आला. कर्मचार्‍यांना अनुदान मिळावे म्हणून आम्ही प्रयत्न करीत आहोत. कसं..कसं..पैसे सुद्धा आणले आहे. सर्व तरतूद झाली होती मात्र शेवटच्या क्षणी पैसे देण्यास नकार देण्यात आला. खरंच कर्मचार्‍यांना अनुदान मिळावे हा मनोमन इच्छा असणार्‍या काही नगरसेवकांनी जागीच राजीनामा दिला पाहिजे होता म्हणजे नेत्यांना सुद्धा विचार करावा लागला असता, मात्र तसे न करता अनुदान मिळालेच पाहिजे असा तगादा लावला.

नगराध्यक्षा किती सहनशिलतावादी….
बारामती नगरपरिषदेत गटा-तटाचे राजकारण कोणी केले. या टर्ममध्ये किती मुख्याधिकारी बदलले, कित्येक वेळा आपआपसात नगरसेवकांचे वाद झाले, आंदोलने झाली. तू..तू..मै…मै झाली असा खडतर प्रवास नगरपरिषदेचा सुरू असताना, या प्रवासात महिला नगराध्यक्षांनी किती सहनशिलता ठेवली असेल याचा विचार जर केला तर नगराध्यक्ष पदाचे मुकूट किती काटेरी आहे हे समजून येईल.

ना.पवार यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक यांच्याशी याविषयावर चर्चा केली. या लोकांव्यतिरिक्त तज्ञांचा व शासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा सल्ला सुद्धा अजितदादांनी घेतला व अनुदान देता येणार नाही असे सांगितले असल्याचे कळते. म्हणजे कोणाच्या प्रयत्नाने किंवा कोणाच्या अडथळ्यामुळे सानुग्रह अनुदान मिळाले नाही असा गैरसमज कर्मचार्‍यांमध्ये निर्माण झाला होता तो अजितदादांच्या बैठकीनंतर स्पष्ट झाला.

दादा, स्वीकृतांचे राजीनामे घ्या….
‘नाकापेक्षा मोती जड’ या म्हणीप्रमाणे काही स्वीकृत सदस्य व नगरसेवक नगरपालिकेच्या विरोधात षडयंत्र रचीत असतात. साहेब, दादा व ताईंचे विशेषत: बारामतीचे नाव कसे बदनाम होईल अशी भूमिका घेत आलेले आहेत. त्यामुळे स्वीकृतांचे राजीनामे लवकर घ्यावे असे पक्षातील पदाधिकारी, नगरसेवक व जनतेतून मागणी होताना दिसत आहे.

बारामती नगरपरिषदेचे सर्वच कर्मचारी ‘आपली नगरपालिका’ या नात्याने तन-मनाने काम करीत असतात व करीत आलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर या सर्वच कर्मचार्‍यांनी जे काम केले ते वाखण्याजोगे होते. या कामाची दखल घेत एन्व्हॉर्लमेंटल फोरम ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेने कोविड योद्धे म्हणून काहींना पुरस्कार देवून सन्मानीत केले, याचा आदर्श तमाम बारामतीकरांना आहे.

सानुग्रह अनुदान मिळणार नाही हा विषय कोअर कमिटीने आलेल्या आदेशान्वये घेतलेला असताना या कमिटीतील काही सदस्यांनी कर्मचार्‍यांना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र काही सदस्यांनी कर्मचार्‍यांपर्यंत योग्य माहिती पोहचविणे महत्वाचे असताना तरी कर्मचार्‍यांचे आंदोलन होत असेल तर आंदोलनाला खतपाणी कोणी घातले हा विषय नागरीकांसमोर चर्चेचा ठरला आहे.

परंतु, काही नगरसेवक मंडळी नवखी आहेत. जर एकच माणुस नगरपरिषद चालवीत असेल तर वेळोवेळी अजितदादा किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी सभेपूर्वी पार्टी मिटींगचे आयोजन करतात त्यावेळी या नगरसेवकांनी थेट अजितदादांना नगरपरिषदेचा सर्व कारभार हा एकच नगरसेवक पाहतो, आम्हाला काही सांगत नाही अशा स्वरूपाची तक्रार आजपर्यंत का केली नाही. यापुर्वी सानुग्रह अनुदान दिले होते त्यावेळी एकच माणुस नगरपालिका चालवितो ते नगरसेवकांनी विरोध का केला नाही. तुम्ही तरी नवखे आहात, हे नगरसेवक कित्येक वर्ष, टर्म नगरसेवक म्हणून चोख भूमिका बजावित आले आहेत तेही अजितदादांचा विश्र्वास संपादन करीत. जर या एका नगरसेवकांनी नगरपालिका चालविली असती तर अजितदादांनी या नगरसेवकांना कधीच घरचा रस्ता दाखविला असता. एवढा विश्र्वास या नगरसेवकांनी निर्माण केला आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला असा काही नगरसेवक प्रकार करताना दिसत आहे. शेवटी सानुग्रह अनुदान देण्यास कोणी नकार दिला, का दिला हे सर्वांसमोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!