अनेकान्त एज्युकेशन सोसायटीस तेलंगणा कृषीमंत्र्यांची सदिच्छा भेट!
बारामती(वार्ताहर): शिक्षणक्षेत्रात गेल्या 60 वर्षांपासून ज्ञानदानाचे अविरत काम करणार्या संस्थेची प्रगती कौतुकास्पद आहे. बारामतीच्या विकासामध्ये संस्थेचा देखील महत्वाचा वाटा आहे हे पाहून समाधान वाटले असे गौरवोद्गार तेलंगणा राज्याचे कृषीमंत्री एस.निरंजन रेड्डी यांनी काढले.
एस.निरंजन रेड्डी यांनी अनेकान्त एज्युकेशन सोसायटीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व अनेकान्त इंग्लीश मिडीयम स्कूलला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील विविध विभागांची त्यांनी पाहणी केली व उपक्रमांची माहिती घेतली. त्यांनी व्होकेशनल सेंटरमधील फुड प्रोसेसिंग, जर्नालिझम आणि रिटेल मॅनेजमेंट विभागांना भेट दिली. तेव्हा व्यवसायभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.
प्राचार्य डॉ.चंद्रशेखर मुरुमकर यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख मांडला. संस्थेचे सचिव जवाहर शाह वाघोलीकर यांच्या हस्ते एस.निरंजन रेड्डी यांचा सत्कार करण्यात आला.
कृषीमंत्री एस.निरंजन रेड्डी यांनी अनेकान्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजला देखील भेट दिली. याप्रसंगी डॉ.एम.ए.लाहोरी यांनी माहिती दिली. अनेकान्त इंग्लीश मिडीयम स्कूलला देखील भेट दिली. बारामतीमध्ये अशा प्रकारची शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी शाळा असल्याचे कौतुक त्यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्कूलकडून ऑनलाईन एज्युकेशनसाठी सुरु असलेल्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
स्कूलच्या मुख्याध्यापिका राखी माथूर यांनी अनेकान्त स्कूलबाबत माहिती दिली. संस्थेच्या या तीनही शैक्षणिक घटकांशी तेलंगणा राज्यात सहकार्य करायला निश्चितच आम्हांला आवडेल अशी भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली.