हजरत मुहम्मद पैगंबर (स.) यांची अंतिम घटका जवळ आली तेव्हा त्यांनी लोकांना उद्देशून प्रतिपादन केले ’पाहा ! मी दोन गोष्टी तुमच्या सुपूर्द करून जातो आहे. जोवर तुम्ही त्यांना घट्ट धरून ठेवाल तोवर तुम्ही सन्मार्गावरून भटकणार नाही. त्या दोन गोष्टी कुरआन आणि मी जे सांगितले आणि केले ते, म्हणजे हदीस.’
कुरआनाबाबत सांगावयाचे तर तो एक साक्षात चमत्कार आहे. मनुष्य प्राण्यांमध्ये येऊन त्यास चौदाशे वर्षे लोटली आहेत. आतापर्यंत लाखो नव्हे, तर कोट्यवधी अब्जावधी लोकांनी त्याचे वाचन, पठण केले आहे. किमान त्याला स्पर्श तरी केला आहे. या पवित्र ग्रंथाच्या वाचकात आबालवृध्दांचा समावेश आहे. याचे वैशिष्ट्य असे की, कोठल्याही आवृत्तीत आजतागायत एका अक्षराचाही फेरफार वा फरक आढळणार नाही. हजरत मुहम्मद पैगंबर यांनी सर्वप्रथम आणि सरतेशेवटी सादर केले होते ते जसेच्या तसेच आढळते. जगातील सर्वाधिक छापला व वाचला जाणारा हा महान ग्रंथ आहे. याची प्रत्येक आवृत्ती दरवर्षी कोट्यवधीच्या संख्येत प्रकाशित होत असते. असे असले तरी त्याच्या कोठल्याही आवृत्तीत एखाद्या स्वराचा अथवा अक्षराचादेखील फेरबदल आढळत नाही. याची प्रचिती हवी असल्यास कुठल्याही जनसमुदायासमोर कुराआनचे पठण करतांना हेतुपुरस्सर चुका करून बघा. पठण करणार्याच्या चुका उपस्थितांतील हाफ़िज़’ पटकन त्याला अडवून त्याच्या पदरात टाकतील. ’हाफ़िज़’ म्हणजे कुरआन मुखोद्गत करणारे. आमची अशी खात्री आहे, की असे दहा पंधरा तरी हाफ़िज़’ लहानशा गावातदेखील आढळतील.
यदाकदाचित जगातील कागदाचा सर्व साठा संपला, छापखाने बंद पडले तरी अल्लाहच्या या आदेशांबाबत श्रध्दावंतांना चिंतीत होण्याचे कारण नाही. कारण खुद्द आपल्या भारतात दरवर्षी असे तीस ते तेहतीस हजार ’हाफ़िज़’ तयार होत असतात. संपूर्ण भारताच्या सुमारे तीन लाख पंचवीस हजार मशिदींमधून सुमारे सहा ते आठ कोटी नमाजी लोकांना रमज़ानच्या महिन्यात संपूर्ण कुरआन ऐकवला जातो, परंतु सर्वाधिक विस्मयजनक बाब अशी की मक्केत जेव्हा कुरआनची पहिली आयत (श्लोक) अवतरली तेव्हा संपूर्ण मक्का शहरात विशेषतः कुरैश जमातीत (हजरत मुहम्मद पैगंबर यांचा जन्म याच जमातीतला) कुरआन लिहून घ्यावयास हाताच्या बोटांवर मोजण्या इतके लोक उपलब्ध होते. परंतु पुढे जेव्हा याचा प्रचार व प्रसार जगभर झाला तेव्हा यातील वास्तव, मोकळेपणा यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. याने मानवी समाजाच्या चिंतनाला एक आगळी वेगळी दिशा बहाल केली. एक नूतन शैली प्रदान केली. रेव्ह. जी. मारगोलेथ यांनी कुरआनचे भाषांतरकार जे. एम. रोडवेल याच्या भाषांतराच्या आरंभी म्हटले आहे की, जगातील आढळणार्या सर्व महान ग्रंथात, निश्चितपणे कुरआनचे एक उच्च स्थान आहे. अगदी अलीकडच्या काळात अवतरलेल्या ह्या ग्रंथास नव्या युगास चालना देणार्या ग्रंथात (कुरआनला) नि:संशय एक अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. साहित्याच्या परमसीमा ओलांडलेल्या या ग्रंथाने जनसमूदायावर एक विलक्षण प्रभाव प्रस्थापित केला आहे. ह्या ग्रंथाने माणसांच्या विचारसरणीत एक नाविण्यपूर्ण बदल घडवून आणले आहे आणि त्यांच्या स्वभावाला (वृत्ती आणि गुणांना) एक अत्याधुनिक व ताजे वळण दिले आहे!
कुरआनच्या जगभरच्या प्रसाराने स्पर्धेच्या एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. आणि जे योग्य आहे ते टिकेल या सनातन तथ्याचा जगाला पुन: प्रत्यय आला. कुबड्यांच्या आधारे आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करणार्या तकलादू साहित्याचा अस्त झाला. अभिजात साहित्यच तेवढे जगाच्या पाठीवर अक्षर साहित्य म्हणून जिवंत राहिले. कालातीत होते तेच साहित्य कायम टिकले. उपजत तेच जगले. ते निसर्गनियमाला धरूनही झाले. जगात तेच साहित्य आपले अस्तित्व राखूशकते जे मानवजातीच्या प्रगतीसाठी व हितार्थ लिहिले गेले आहे. जुलूम आणि दुष्टपणाचा संदेश देणार्या साहित्याला अक्षर वा अमर साहित्याचा दर्जा कदापी लाभू शकत नाही. कुरआन मधील संदेशाचा प्रसार होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या काही साहित्याच्या वाचनाने माणसे हतबुद्ध होत असत. काही ग्रंथांचे श्रवण करताना कोणीतरी वितळलेले शिसे कानात ओतीत आहे असा भास होत असे. (लेखक-अनीस चिश्ती)