एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या सदस्यांनी कोरोना योद्धांचा सन्मान,व्हर्च्युअल वृक्षारोपण, 100 पीपीई किट, 157 रेमडीसीवीर इंजेक्शनचे वाटप करून दिला सामाजिक संदेश
बारामती(वार्ताहर): येथील पर्यावरण या विषयावर गेली अनेक वर्षे सातत्याने काम करणार्या, आदर्श गाव काटेवाडीच्या शिल्पकार, बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू वृद्धांना दृष्टिदानाचे काम करणार्या एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सौ.सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या सदस्यांनी सामाजिक संदेश देत साजरा केला.

यामध्ये गेली आठ महिने कोरोना महामारीमध्ये मृत्युमुखी पडणार्या रुग्णांच्या अंत्यविधीची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असणार्या बारामती नगर परिषदेच्या कोरोना योद्धा कर्मचार्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सन्मान करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून कोरोना संसर्गाशी दोन हात करणार्या योध्यांना आवश्यक असणार्या 100 पी पी ई किटचे वाटप करण्यात आले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे, यातील ज्या रुग्णांची प्रकृती खूप खालावते, ज्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो, अशावेळी त्या अत्यवस्थ रुग्णाला आवश्यक असणार्या रेमडीसीविर या 157 इंजेक्शनचे वाटप शासकीय रुग्णालयांना भेट देण्यात आली.

कार्यक्रमास बारामती नगरीच्या सन्माननीय नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, बीडीओ राहुल काळभोर, मुख्याधिकारी किरणराज यादव, आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे, सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सदानंद काळे, अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील , फोरम सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

याच बरोबर सुनेत्रावहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक महिना व्हर्च्युअल वृक्षारोपण मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात एक स्वदेशी झाड लावून त्याचा फोटो फोरमच्या लिंक वर पाठवायचा आहे, याचे एक प्रमाणपत्र ऑनलाईन त्या व्यक्तीला पाठविले जाणार आहे, अशा विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सुनेत्रावहिनी पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
