बारामती(वार्ताहर): दि.11 ते 17 ऑक्टोबर राज्यात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला होता. त्यानुसार महाराष्ट्रात कोकणसह आतल्या भागात पाऊस पूर्णपणे सक्रीय झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गडगडाटासह जोरदार वारे वाहू लागलेले आहेत. या पावसाचा कापणीला आलेल्या पिकांना धोका उत्पन्न होणार आहे. याचा सर्वात जास्त फटका हा शेतकर्यांना बसणार आहे. सोयाबीनसह अनेक पिकेही काढणीला आली आहेत. त्यामुळे शेतकर्यांची रात्रीची झोप उडाली आहे.
सततच्या पावसामुळे सोयाबीनच्या शेंगांना झाडावरच कोंब फुटले आहेत. त्यामुळे सोयाबीन शेतकर्यांच्या हातातून गेल्यात जमा आहे. भाजीपाला आणि इतर फळपिकांनाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आता मजुरांची कमतरता असल्याने शेतकर्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट, बाजारातली मंदी, मजुरांची कमतरता यामुळे मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे.
बारामतीत व आसपासच्या अनेक भागात शनिवारी दुपारी आकाश अचानक भरून आला. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पण पुढचा आठवडाही असंच वातावरण राहणार आहे, त्यामुळे सावध राहा असं वेधशाळेने म्हटलं आहे. अंदमानजवळ निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा अधिकाधिक तीव्र होत असल्याने महाराष्ट्र, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना धोका असल्याची वेधशाळेची माहिती दिली आहे.