बारामती(वार्ताहर): बारामती नगरपरिषदेच्या वाढीव हद्द रूई व आसपासच्या परिसरात झालेला विकास, वाढती लोकसंख्या व विजेची वाढती गरज पाहता राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या संकल्पनेतून भूमिगत वीज पुरवठा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
रूई गावातील धोकादायक वीजवाहक तारांमुळे कित्येकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत महावितरण कंपनीस ही गोष्ट सतत निदर्शनास आणून दिलेली होती. शेवटी स्थानिक नगरसेविका सुरेखा पांडुरंग चौधर यांनी तारा न काढल्यास आंदोलन करण्याचा इशारा थेट महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे योना निवेदन सादर केले. सदरची बाब ना.अजित पवार यांना सुद्धा सांगितली होती. स्वत:च्या प्रभागात वीजवाहक तारांच्या त्रासाला कंटाळून नगरसेविका सौ.चौधर यांनी जी आंदोलनाची भूमिका घेतली त्यामुळे आज भूमिगत वीज पुरवठा काम मार्गी लागल्याचे येथील स्थानिक नागरीकांनी बोलताना सांगितले.
यावर तातडीने ना.अजित पवार यांनी नगरपरिषद वाढीव हद्दीतील रूई गावठाण येथे भूमिगत वीज पुरवठा काम करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी स्थानिक नगरसेविका सौ सुरेखा चौधर, महावितरणाचे मुख्य अभियंता श्री.पावडे, श्री.पाटील, श्री.लटपटे, श्री.गावडे, श्री.कानतोडे, सावंत, श्री.बालाजी तसेच राष्ट्रवादीचे नेते पांडुरंग चौधर, अजिनाथ चौधर, ज्ञानदेव साळुंके, राघु चौधर, गोरख चौधर, नितीन पानसरे, विशाल जगताप, आबा खाडे, लक्ष्मण चौधर,अजित साळुंके, सूरज चौधर इ.ग्रामस्थ उपस्थित होते.
नव्याने अद्ययावत तंत्रज्ञानाची भूमिगत वीज पुरवठा होणार असल्याने वाढीव हद्दीत विशेषत: रूई गावठाणात आनंदाचे वातावरण आहे.