जागतिक कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण इतर संसर्ग रोग पडद्यामागे टाकले आहे. कोरोना विषाणूबाबत ज्या प्रमाणे नागरीकांनी सतर्कता दाखविली त्याच पद्धतीने काही दिवसातच आपल्या दारात येऊन ठेपणार्या डेंगू संसर्गापासून सावधान राहण्याची गरज आली आहे. कोरोना अदृश्य शस्त्रू होता मात्र, कोरोना दृश्य शत्रू आहे.
डेंगू विषाणूजन्य रोग असून तो डासांद्वारे पसरतो हे सर्वांना ज्ञात आहे. एन्डी इजिप्ती डासाने डेंगू विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्ये प्रसारीत होतो. यामध्ये सगळ्यांना याची लक्षणे चांगली माहिती आहेत. यामध्ये उच्च-ताप येणे, तीव्र डोके दुखी, मळमळणे, डोळ्यांच्या मागे दुखणे, सांधेदुखी, थकवा येणे, शारिरीक वेदना होणे, भूक न लागणे, त्वचेवर पुरळ येणे ही लक्षणे दिसू लागतात. या संसर्गात ताप आणि इतर लक्षणे एक आठवडे राहतात मात्र त्यानंतर येणारा अशक्तपणा आणि भूक न लागणे हे अनेक आठवडे टिकू शकतात हा या डेंगूच्या संसर्गाचा खरा प्रमुख भाग आहे.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर तालुकास्तरावर पंचायत समिती, नगरपरिषद, ग्रामपंचायतीचे सर्व विभागांनी काम केले. कोणीही हा विभाग आरोग्य खात्याचा आहे असे म्हणून जबाबदारी झटकली नाही. यामुळे इतर विभागांवर परिणाम झाला तो नाकारता येणार नाही. मात्र, डेंगू होऊ नये म्हणून संबंधीत खात्याने आपला परिसर स्वच्छ कसा राहील हे पाहणे गरजेचे आहे. डास कुठे होतात हे माहिती आहे. प्रथमत: तर नागरीकांनी आपल्या परिसरातील जे मोकळे प्लॉट पडीक पडले आहेत त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याबाबत तातडीने त्या प्लॉट धारकास नोटीस काढून आठ दिवसात प्लॉट साफसफाई करण्याचे आदेश संबंधीत संबंधीत खात्याने दिले पाहिजे. जर संबंधीत प्लॉट मालकाने याबाबत कुचराई केल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी. घरात, गच्चीत, पोटमाळ्यात जुने टायर, वस्तु इ. वस्तुंचा आडोसा हे डास घेऊन त्याठिकाणी अंडी घालतात. त्यामुळे या वस्तु काढून फवारणी करावी जागा स्वच्छ करून घेतली पाहिजे. उन्हाळ्यात घराबाहेर लावण्यात येणारे कुलर यामध्ये साचून राहणारे पाणी दररोज बदलणे गरजेचे आहे. आपला परिसर स्वच्छ कसा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. प्रभाग, वॉडात फवारणी करून परिसर निर्जंतुकीकरण केला पाहिजे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेनंतर ज्याप्रमाणे आरोग्य विभागास इतर खात्याच्या अधिकारी व कर्मचार्यांनी ज्याप्रमाणे सहकार्य केले त्याचप्रमाणे डेंगू होऊ नये म्हणून तत्पुर्वी करण्यात येणार्या उपाययोजनांमध्ये आरोग्य खात्याबरोबर इतर खात्यांनी सुद्धा तेवढेच लक्ष देणे गरजेचे आहे. डेंग्यू उद्रेकासाठी पर्यावरणातील अनियंत्रित लोकसंख्या वाढ, अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण, कचर्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन, पाणीपुरवठयाचे सदोष व्यवस्थापन पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि अनियमित पाणीपुरवठा, जागतिक पर्यटनात होणारी वाढ, ग्रामीण भागातील मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणातील व जीवनशैलीतील बदल कारणीभूत ठरत आहेत.
सर्वच काम पंचायत समिती, नगरपरिषद किंवा ग्रामपंचायत करेन असे नाही. तुम्ही ही या भारताचे नागरीक आहात. तुमचीही काही ना काही जबाबदारी आहे. आपला परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी प्रयत्न करने गरजेचे आहे. जो कोणी रस्त्यावर कचरा टाकीत असेल, घाण करीत असेल तर त्यास आपली जबाबदारी कर्तव्य या नात्याने संबंधित व्यक्तीला टोकले पाहिजे. नदी, नाले, ओढ्यांमध्ये कचरा टाकू नये. नगरपरिषदेचे रोज वाहन तुमच्या दारात कचरा संकलन करण्यासाठी येत असते मात्र, काही व्यक्ती त्या वाहनापर्यंत जाण्याचा कंटाळा करतात आणि कचरा साठवणूक करून सहज टाकता येईल अशा ठिकाणी टाकून देतात यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतो.
गाव, तालुका, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. यापुढे कोणीही व्यक्तीने गहाळ न राहता येणार्या डेंगूशी दोन हात करून लढण्याची शक्ती निर्माण करा. प्रतिकार शक्ती वाढवा. सकस अन्न खा! इतरांना याबाबत काळजी घेण्यास सांगा. डेंगूमुळे कोणी दगावला गेला नाही पाहिजे यासाठी तत्पुर्वी जागृती केली आहे.