बारामती(वार्ताहर): दि. 3 ऑक्टोबर रोजी 278 रूग्णांचे आरटी-पीसीआर नमुने घेण्यात आले होते. यामध्ये 111 रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत होते. मात्र ते सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
111 रूग्णांचे अहवाल प्रतिक्षेत म्हटल्यानंतर प्रशासनापासुन ते नागरीकांपर्यंत चिंतेचा प्रश्र्न होता. मात्र ते सर्वच्या सर्व रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी कळविले आहे. बारामती शहरात ऑक्टोबर 1,2,3 तारखेच्या रूग्णांची माहिती घेतली असता अनुक्रमे 18,25, आणि 21 अशी नोंद दाखवित आहे. तर तीच ग्रामीण भागात अनुक्रमे 31,42 आणि 36 अशी आहे.
ग्रामीण भागात आजही युवक मुखपट्टी न लावता सर्रास फिरताना दिसत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना शहरात आहे ग्रामीण भागात नाही. मात्र शहरापेक्षा ग्रामीण भागाची आकडेवारी पाहिल्यास कोरोना नक्की कुठे जास्त आहे हे लक्षात येईल. कोणीही निष्काळजीपणे सार्वजनिक ठिकाणी वावरू नये. आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींसाठी मुखपट्टी, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स्चा वापर करावा म्हणजे कोरोना विषाणूपासुन स्वत:चा नाही पण घरातील वृद्ध व्यक्तींचा बचाव होईल.