असं म्हणतात, ‘दिलं..घेतलं’ काढू नये पण कवयित्री आशा दमयंती देविदासराव पैठणे यांनी लिहीलेल्या ‘दिले…घेतले’ या आत्मचरित्रामुळं मराठी साहित्यात ‘पैठणे शैली’चं नवं दालन उघडल्या गेलं आहे. कारण हे पुस्तक आत्मचरित्र किंवा आत्मकहाणीच्या परंपरागत पध्दतीनं मांडलेलं नाहीए. यातील घटना, प्रसंग मांडतांना त्या एकांगी पध्दतीनंही आलेल्या नाहीत. लेखिका स्वत:चा बडेजाव मिरवतांनाही दिसत नाही. जे काही घडलं ते प्रामाणिकपणे कथन करण्यात आलं आहे. जिथं चुकलं तिथं प्रांजळपणे चूक मान्यही करण्यात आली आहे. त्या-त्या प्राप्त परिस्थितीत घेतलेले निर्णय, त्यांची चांगली-वाईट परिणीती आणि त्याची स्वीकृती यामुळं ‘दिले…घेतले’ हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवतं.

पुस्तकाची सुरुवात लेखिकेच्या जन्मापासूनच्या प्रसंगानं होते. लेखिका प्रत्येक प्रकरणात वाचकाला त्याचा हात धरुन अनुभवसागरातून घेऊन जात असल्याचा प्रत्यय येतो. यात वाचक डुबकी घेत असतांनाच त्याला अलगद काठावर आणून बसवते आणि स्वत:ही तटस्थपणे त्यावर भाष्य करते. हा अनुभव प्रत्येक प्रकरणात येतो. या पुस्तकात साधारण 60-62 वर्षांचा कालपट आहे. त्या काळच्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन सहजतेनं घडतं. लेखिकेच्या जीवनातील चढ-उतार, संकटं यांचा मागोवा घेतांना आयुष्यात आलेल्या माणसांविषयीही त्यांनी मनोज्ञपणं मांडलंय. साहित्यश्रेष्ठ नरहर कुरुंदकर, रा. रं. बोराडे, लक्ष्मीकांत तांबोळी, सूर्यकांता पाटील, प्रा. भास्कर चंदनशिव, ज्येष्ठ कवयित्री श्रध्दा बेलसरे (पूर्वाश्रमीच्या जयश्री खारकर), जगदीश कदम, मधू गिरी, रविचंद्र हडसनकर, वसंत मैया, रमाकांत कुलकर्णी, नयन बाराहाते, ज्येष्ठ सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, डॉ. निपुण विनायक अशा अनेक नामवंतांचा उल्लेख आपणांस वाचावयास मिळतो.
आशा पैठणे या मूळच्या कवयित्री असल्यानं एखाद्या प्रकरणात करुणरसाचा परिपोष होत आहे किंवा उदासवातावरण निर्मिती होत आहे, हे लक्षात येताच ते प्रकरण प्रेरणादायी विचारांवर थांबविण्याची कला त्यांना अवगत झालेली दिसते. म्हणी, वाक्प्रचार, रुपक, उपमा, सुविचार यांची प्रसंगोपात्त पखरण वाचकाला मनोमनी आनंद देऊन जाते.
कुटुंबात मुलगा-मुलगी असा भेद नसला तरी ‘कणभर फरक’ जाणवायचा हे संवेदनशील मनानं टिपलेलं वास्तव किंवा ‘खरंच, माणसापेक्षा धर्म श्रेष्ठ असतो?’ हा लेखिकेच्या मनाला पडलेला प्रश्न वाचकालाही पडतो. ‘देणाऱ्याचं मन पहावं, कुवत नाही’ अशी शिकवण देणारी आई असली तरी परिस्थितीमुळं लेखिकेच्या बालपणातील कितीतरी कोवळे कोंब फुलाऱ्यात आलेच नव्हते, याचीही जाणीव आपल्याला होते. ‘कुठल्याही घटनेकडे एक घटना म्हणून न पहाता मन आणि बुद्धीचे परिमाण वापरुन त्या -त्या घटना, प्रसंगांना पाहिले पाहिजे’ ही शालेय जीवनात मिळालेली शिकवण, ‘कपडा उसवला की त्याला वेळीच टाका घालायचा असतो, हे जीवनाचं तत्वज्ञान माहीत होतं पण मनच उसवलेलं असेल तर कसं सांधायचं? हा गहन प्रश्न, ‘पारिजातकासारखं अल्पसं जरी आयुष्य मिळालं, तरी लयलूट मात्र सुगंधाची करायची असते, कारण आपण एकदाच माणूस म्हणून जन्माला येत असतो’ हा प्रेरणादायी संदेश, ‘प्रत्येक जखम जुनी होते, जखमा भरुन निघतात. पुन्हा खपली काढून जखम सोलून काढली नाही म्हणजे मग जखमांचे व्रणसुध्दा आपलेसे होऊन जातात’, हे अनुभवातून आलेलं शहाणपण वाचकांच्या मनात घर करुन जातं.
परिस्थितीमुळं आलेल्या एकलकोंडेपणामुळं बालपण हरवून गेलं होतं. याचा परिणाम लेखिकेच्या व्यक्तिमत्वावर आपोआप होत गेला. शालेय जीवनातील खोड्या, शिक्षिकांमुळे लागलेली शिस्त, वडिलांमुळं रुजलेलं श्रमप्रतिष्ठा हे मूल्य, चांगली शिक्षिका बनण्याची मिळालेली प्रेरणा, स्वत:मधील गवसलेली कवयित्री, आयुष्य सुंदर बनवायला पैसा लागत नाही, त्यासाठी माणसे जोडावी लागतात, हा विचार, असहाय्यतेचा फायदा घेऊन जर कुणी मदत देऊ केली तर ‘नकार’देता आला पाहिजे, हे आईमुळं लाभलेले संस्कार अशा अनेक बाबींमुळं ‘दिले… घेतले’ वाचनीय झालं आहे.
बाईच्या आयुष्यात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे शिक्षण आणि आर्थिक बळकटी. मुलगी शिकली की आपोआप तिची प्रगती होते… आणि हेच शिक्षण तिला नोकरी, व्यवसाय, राजकारण, समाजकारण व अर्थकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रात संधी मिळवून देते. हा स्वानुभवातील संदेश आजच्या काळातही महत्त्वाचा असल्याचं जाणवतं.
लेखिकेच्या बालवयातील चौकसपणाचा प्रत्यय देणारा एक प्रसंग आहे. फकिराच्या बकरीचं नाव ‘काशी’ होतं. मुसलमान माणसानं शेळीचं नाव काशी कसं ठेवलं असेल ? हा प्रश्न मनात होता. एक दिवस मी त्यांना विचारलं. ‘फकीरचाचा तुमच्या शेळीचं नाव तुम्ही काशी कसं काय ठेवलं हो ?’ ते म्हणाले, ‘ताई, कारभारी माळ्या के पाससे काशी को खरीदा था. कारभारी बोला इसका नाम काशी है, फीर मैने सोचा बचपनसे उसका धर्म हिंदू है. अपने को क्या फरक पडेगा उसके नामसे, दूध से मतलब. काशी रखा क्या और सुलताना रखा क्या. दूध थोडा ही हिंदु या मुसलमान होने वाला है. इसलिए पहेलेकाच नाम रखा. मेरी अम्मी को भी काशी नाम अच्छा लगा…’
स्वत:चं आयुष्य इतरांसमोर मांडायचं का, हा प्रश्न लेखिकेलाही पडला होता. पण मनानं जो कौल दिला, त्यानुसार निर्णय घेतला. रस्ता जरी खूप मोठा होता, तरी घट्ट पाय रोवून अन् दमदार पाऊल पुढं टाकत त्यांनी स्वत:ची पायवाट निर्माण केली. त्यांच्या जीवनप्रवासात ‘गोदावरी टाइम्स’मधील पत्रकारिता, सर्व शिक्षा अभियानातील सेवा, नांदेड येथील गुरु –ता–गद्दी सोहळा यातीलही अनुभव आहेत. एखाद्या चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक झालं नाही तरी ‘थेंबातील आभाळ’ मिळालं म्हणून समाधान मानण्यातील मोठेपणा वाचकांच्या मनाला भिडतो. कोणत्याही प्रसंगात नाउमेद न होता ‘ताठ बाणा, उंच मान, हीच आमची खरी शान’ या आईच्या शिकवणीनुसार एकांड्या शिलेदाराप्रमाणं प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली. म्हणूनच ‘पैठणे शैली’तील ‘दिले…घेतले’ वाचकांना अनुभवसंपन्न करुन जातं.
मुखपृष्ठाविषयी- सृजनशील चित्रकार नयन बाराहाते यांनी मुखपृष्ठावर ‘बोगनवेल’ सुंदररित्या साकारलेली आहे. अंगोपांगी काटे मिरवणारी ‘बोगनवेल’ रणरणत्या उन्हातही बहरुन येते. गंध नसला तरी तिचं बहरणं मनोवेधकअसतं. इतर वेलींची फुलं कळ्यांमधून जन्म घेतात. हिची गोष्टच वेगळी. हिच्या पानांचीच फुलं होतात. ‘बोगनवेल’ चार-चौघींपेक्षा वेगळी, लेखिकेचंही हे निराळेपण मुखपृष्ठातून अधोरेखित होतं.
लेखिका- आशा पैठणे
मुखपृष्ठ – नयन बाराहाते
प्रकाशक – रजत प्रकाशन, औरंगाबाद
पृष्ठं- 264
किंमत-325रुपये
राजेंद्र सरग 9423245456